संपामुळे कामकाज ठप्प
By admin | Published: November 18, 2016 04:42 AM2016-11-18T04:42:32+5:302016-11-18T04:42:32+5:30
तालुक्यात ग्रामसेवक आणि तलाठी आणि पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. तलाठी दफ्तरी असणारी
वडगाव मावळ : तालुक्यात ग्रामसेवक आणि तलाठी आणि पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. तलाठी दफ्तरी असणारी शेतकऱ्यांची कामे स्थगित झाली आहेत. या आंदोलनाची झळ सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून, विविध प्रकारचे दाखले मिळत नसल्याने सर्व त्रस्त झाले आहेत.
आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्यामुळे ग्रामसेवकांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी ग्रामसेवकांनी आपल्या कार्यालयाच्या चाव्या आणि कार्यालयीन शिक्के गटविकास अधिकारी नीलेश काळे यांच्याकडे जमा केल्या आहेत. या वेळी मावळ तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बी. आर. मतकर, सचिव के. पी. खेसे, उपाध्यक्ष एस . डी. नाईककडे, संघटक डी. एस. शिरसाट, पी. पी. घोडेकर, आर. बी. देशमुख , के. उळागडे, के. डी. लोखंडे व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्ष सेवाकाल नियमित करण्याचा तातडीने निर्णय घ्यावा, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना प्रवास भत्ता म्हणून तीन हजार रुपये दरमहा पगाराबरोबर मिळावेत, ग्रामसेवक संवर्गाची शैक्षणिक अर्हता पदवीधर असावी, सन २०११च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे निर्मिती करावी, ग्रामसभेची संख्या मर्यादित असावी व ग्रामसभा, सचिव बदल होणे व ग्रामसभेत सुधारणा होणे, तसेच नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा असावी, ग्रामसेवक संवर्गाकरता वैद्यकीय कॅशलेस सुविधा मिळावी, राज्यस्तर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण करावे अशा मागण्या आहेत.
१२ जून २०१३चे विनाचौकशी, फौजदारी केसेस परिपत्रक मागे घ्यावे, २० ग्रामपंचायतीकरिता विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, समाजकल्याण विस्तार अधिकारी पदे भरावीत , केंद्र पुरस्कृत विस्तार अधिकारीपद निर्मिती करावे, सन २००५नंतर सेवेत असणाऱ्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी , ग्रामसेवक संवर्गाचा सुधारित जॉब चार्ट तयार करावा, राज्यभर होणारे ग्रामसेवकावरील हल्ले, मारहाण, खोट्या केसेस याबाबत सेवा संरक्षण व सरकारी कर्मचारी मारहाण गुन्हा अजामीनपात्र करणेस्तव निर्णय घेणे आदी मागण्यांसाठी ग्रामसेवक काम बंद आंदोलन करत आहेत.
आंदोलनामुळे नागरिकांना विविध दाखले, उतारे व इतर शासकीय कागदपत्रे मिळण्यासाठी गैरसोय होत आहे. यास पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असून, वेळेत मागण्या मान्य न केल्यास हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असे मावळ तालुका ग्रामसेवक युनियन अध्यक्ष बी. आर. मतकर यांनी सांगितले. (वार्ताहर)