बटन दाबा, पोलीस हजर पद्धतीने नव्या पोलीस आयुक्तालयाचे कामकाज : आर.के. पद्मनाभन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 03:48 PM2018-08-16T15:48:20+5:302018-08-16T15:50:24+5:30
नागरिकांनी मदतीसाठी पोलिसांपर्यंत जाण्यापेक्षा पोलीसच नागरिकांच्या मदतीला धावून जाणार: आर.के. पद्मनाभन
पिंपरी : पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यामुळे या शहराला आवश्यक तो पोलीस स्टाफ उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी मदतीसाठी पोलिसांपर्यंत जाण्यापेक्षा पोलीसच नागरिकांच्या मदतीला धावून जातील. बटन दाबा, पोलीस हजर अशा पद्धतीने नव्या पोलीस आयुक्तालयामार्फत कामकाज केले जाणार आहे. असा विश्वास पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यदिनी आॅटो क्लस्टर येथे स्वतंत्र पोलीस आयुक्त कार्यान्वित झाले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त पद्मनाभन बोलत होते. औद्योगिकनगरीचे गुन्हेगारीत रूपांतर झाले असल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीत आपण या शहराच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमके काय करणार? या प्रश्नाला आयुक्त पद्मनाभन यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, स्वतंत्र पोलीस आयुक्त झाल्यामुळे अधिकचा स्टाफ उपलब्ध होणार आहे. स्वतंत्रपणे विविध विभागाचे काम चालणार आहे. पोलीस आयुक्तालयाचे कामकाज लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न राहील. जनता पोलिसांकडे नाही तर पोलीस जनतेकडे जातील, अशा पद्धतीने पोलीस आयुक्तालयाचे कामकाज केले जाणार आहे.
एखादी घटना घडते, त्यानंतर पाच मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी दखल घेतली तर जो परिणाम जाणवतो, तो परिणाम अर्धा तासाने दखल घेतल्यानंतर जाणवत नाही, आणखी काही तासांनी दखल घेतल्यानंतर वेगळाच परिणाम दिसून येतो. घटना एकच परंतु परिणाम वेगवेगळे दिसून येतात. त्यामुळे तत्काळ पोलिसांकडून दखल घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. चौका चौकांत पोलीस असतील, कायदा, सुव्यवस्थेच्या दक्षतेसाठी पोलीस कायम सज्ज आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा शहराची कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निश्चितच उपयोग होईल. त्यादृष्टीने योग्य नियोजन केले जाणार आहे. विविध शहरांत काम केल्याचा अनुभव गाठीशी आहे़ येथे काम करताना तो अनुभव निश्चितच कामी येईल, असे त्यांनी नमूद केले.