‘आरेला कारे’मध्ये कार्यकर्त्यांची फरफट

By admin | Published: January 23, 2017 02:55 AM2017-01-23T02:55:42+5:302017-01-23T02:55:42+5:30

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील

Workers' attention in 'Aarela Kare' | ‘आरेला कारे’मध्ये कार्यकर्त्यांची फरफट

‘आरेला कारे’मध्ये कार्यकर्त्यांची फरफट

Next

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारांना प्रवेश देत असल्याने भाजपा गुंडांचा पक्ष होत असल्याची खरमरीत टीका करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘आम्ही कोणाच्या वाटेला जाणार नाही. परंतु, आमच्या वाटेला कोणी गेले, तर ‘आरे ला कारे’ उत्तर देण्याची तयारी आहे. आरे ला कारे या पद्धतीने आम्हीही कृती करू शकतो, असे संकेत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.’ त्यानंतर दुस-याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर ‘दादा, आता तरी दादागिरी थांबवा’ अशी नाव न घेता टीका केली. टीकेमागील उद्देश लक्षात घेतला तर राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले स्थानिक नेतेच भारती चव्हाण यांचे बोलविते धनी असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. मग, राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या निकटवर्तीय व राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धराडे यांना भारती चव्हाण यांच्यावर टीका करण्यास सांगितले. महापौर पदामुळे धराडे यांचे हात अद्यापही राष्ट्रवादीच्या दगडाखाली असल्याने त्यांनी मनापासून नसलीतरी भारती चव्हाण यांचे ‘बोलविते धनी वेगळे’ असल्याची थेट टीका केली. या घटनेवरून एवढेच लक्षात येते की, नेत्यांनी ‘आरेला कारे’ने उत्तर देण्याचे आवाहन केले, तरी लढणारे सैनिक दोन्ही पक्षातील, सीमेवरील आणि पक्षांतराच्या वाटेवरील कार्यकर्तेच भरडले जाणार आहेत. हे मात्र निश्चित आहे.
सध्या भाजपा-शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांचे जागा वाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. केवळ वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यामुळे एकामागून एक औपचारिक बैठका सुरू आहेत. पहिल्या बैठकीला ५०:५० असा फार्म्युला देण्यात आला. त्यानंतर शिवसेनेने ५५:५८ चा फार्म्युला देत चेंडू भाजपाच्या कोर्टात टाकला आहे. परंतु, भाजपाचे नेते १०० जागांवरून ७५ जागांपर्यंत खाली आले आहेत. त्यापेक्षा कमी जागा घेतल्यास भाजपामध्ये गटबाजी उफाळून येऊ शकते. शिवाय राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले स्थानिक नेते व समर्थकांत युतीच्या चर्चेने अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपाचे होऊ घातलेले ‘राष्ट्रवादी’करण हाच युतीसाठी प्रमुख अडथळा ठरत आहे. दोन्ही पक्षातील प्रमुख स्थानिक नेते हे आमच्या युतीची चर्चा उमेदवारी अर्ज भरेपर्यंत सुरू राहणार आहे. असे खासगीत (आॅफ द रेकार्ड) सांगतात. त्यामुळे महापालिका निवडणुकीत युती होण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे.
दुसऱ्या बाजुला महापालिका व जिल्हा परिषदांची निवडणूक ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील स्थानिक नेते व पदाधिकारी आघाडीसाठी अनुकूल प्रतिसाद देत आहेत. अजित पवार यांनी दोन्ही पक्षातील विद्यमान नगरसेवकांसह प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रभागांतील दोन नंबरची मते घेणारे उमेदवार असा उमेदवारी देण्याचा नवा ‘फार्म्युला’ काँग्रेसपुढे ठेवला आहे. त्यानुसार महापालिकेतली ३२ प्रभागांच्या १२८ जागांचे वाटप करायचे ठरविल्यास राष्ट्रवादीला १०० व काँग्रेसच्या वाट्याला २५ ते २८ जागा येण्याची शक्यता आहे. माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचासह नगरसेवकांचा एक गट राष्ट्रवादीत गेल्यामुळे काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे कदाचित भाजपाचा स्थानिक स्वराज्य संस्थातील विजयाचा वारु रोखण्यासाठी दोन्ही पक्ष आघाडीस अनुकूल असल्याची सध्या तरी परिस्थिती आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची युती, तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची होणारी आघाडी यावरच विजयाचा फार्म्युला ठरण्याची शक्यता आहे.
- हणमंत पाटील

Web Title: Workers' attention in 'Aarela Kare'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.