कामगार कुटुंबीयांचे आमरण उपोषण स्थगित
By admin | Published: October 16, 2015 12:46 AM2015-10-16T00:46:42+5:302015-10-16T00:46:42+5:30
प्रलंबित वेतन करारासह विविध मागण्यांसाठी आकुर्डीतील फोर्स मोटर्स कामगारांच्या कुटुंबीय महिलांनी सुरू केलेले आमरण उपोषण आंदोलन बुधवारी स्थगित करण्यात आले
पिंपरी : प्रलंबित वेतन करारासह विविध मागण्यांसाठी आकुर्डीतील फोर्स मोटर्स कामगारांच्या कुटुंबीय महिलांनी सुरू केलेले आमरण उपोषण आंदोलन बुधवारी स्थगित करण्यात आले. त्याऐवजी चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे.
आंदोलन वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त कार्यालय आवारात १ सप्टेंबरपासून करण्यात येत आहे. उपोषणास सुरेखा बोजा, भारती शेलार, हिराबाई रेड्डी, मुमताज मुल्ला, उषा काळे, रेखा जगताप आदींसह शहनाज मनियार यांनी सहभाग घेतला होता. यामुळे त्याची स्थिती खालावली होती. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींच्या आग्रहाखातर ४४व्या दिवशी आमरण उपोषण बुधवारी स्थगित करण्यात आले. यापुढे चक्री उपोषण केले जाणार आहे.
महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते महिलांनी उपोषण सोडले. आझम पानसरे, स्थायी समितीचे सभापती अतुल शितोळे, पुणे जिल्हा कामगार कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम, अॅड. ए. व्ही. अकोलकर, दिलीप पवार, मानव कांबळे, मारुती भापकर, राजन नायर, एमआयएमचे अयान खान, प्रवीण बाराथे, दत्ता साने आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी भरत शिंदे, विक्रम पाटील, राजेंद्र जगताप, गोरख मुंगडे, अमर चव्हाण, हमीद शेख यांनी चर्चा केली. या संदर्भात येत्या २३ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासमवेत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन पवार दिल्याचे महिला समितीच्या अर्पणा वरुडकर
यांनी दिली. (प्रतिनिधी)