अग्नितांडव : थेरगावच्या आगीत जळाल्या कामगारांच्या झोपड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 09:35 PM2019-04-17T21:35:04+5:302019-04-17T21:35:29+5:30
थेरगाव गावठाणातील तापकीरनगर रोडला शनिमंदिरामागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ ठेवलेल्या पीव्हीसी पाइपला अचानक आग लागली. आग इतकी मोठी होती की, परिसरात जणू अग्नितांडव सुरू असल्याचे भासत होते. या घटनेत कामगारांच्या झोपड्या जळाल्या, असल्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
थेरगाव : थेरगाव गावठाणातील तापकीरनगर रोडला शनिमंदिरामागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ ठेवलेल्या पीव्हीसी पाइपला अचानक आग लागली. आग इतकी मोठी होती की, परिसरात जणू अग्नितांडव सुरू असल्याचे भासत होते. या घटनेत कामगारांच्या झोपड्या जळाल्या, असल्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
स्थानिकांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधल्यानंतर दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. वर्षभरापासून थेरगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी नवीन वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ६० टक्के काम पूर्ण झालेले असून, राहिलेले ४० टक्के कामाचे पाइप पाण्याच्या टाकीशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अचानक आग लागून मोठा भडका उडाला. त्यामुळे काही काळ परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. आगीमध्ये पीव्हीसी पाइप जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीची तीव्रता इतकी होती की, धुराच्या लोटांनी पाण्याची टाकी काळवंडली. धुराचे लोट या आदळल्याने पाण्याची टाकी गरम होऊन त्यातून पाणी पाझरू लागले. जलवाहिनी टाकण्याचे काम संथ गतीने होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. काम वेळेत पार पडले असते, तर आज ही दुर्घटना घडली नसती, अशी खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली.
चार झोपड्या खाक
जलवाहिनीचे काम करणाºया कामगारांची कुटुंबे या पाण्याच्या टाकीजवळ वास्तव्यास आहेत. त्यांच्या आठ ते दहा झोपड्या येथे आहेत. आग या झोपड्यांपर्यंत पोहचली आणि ३-४ झोपड्या खाक झाल्या. मात्र सुदैवाने या वेळी झोपडीजवळ कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही आगीमुळे दुखापत झाली नाही.