CA exam : कामगारांच्या मुलाची प्रतिकूलतेवर मात करीत सीए परीक्षेत यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:16 IST2025-01-04T14:15:27+5:302025-01-04T14:16:03+5:30
मध्यमवर्गीय कुटुंबातील सिद्धार्थ हा २३व्या वर्षीच सीए झाला आहे.

CA exam : कामगारांच्या मुलाची प्रतिकूलतेवर मात करीत सीए परीक्षेत यश
पिंपरी : आकुर्डी विठ्ठलवाडी येथील कामगारांचा मुलगा सिद्धार्थ गोरख गव्हाणे याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सीए (सनदी लेखपाल) परीक्षेत यश मिळविले आहे. विठ्ठलवाडीत सिद्धार्थ गव्हाणे वास्तव्यास आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील नंदा व भीमाजी गव्हाणे यांचा सिद्धार्थ हा मुलगा आहे. सिद्धार्थची आई नंदा या शिकवणी, शिवणकाम व घरकाम करतात. वडील गोरख संगणक दुरुस्ती-विक्री आणि त्याचबरोबर गावी शेती करतात. दोन वर्षापूर्वी त्याची बहीण भावना गव्हाणे हिने सीए परीक्षेत यश मिळवले होते.
सिद्धार्थचे प्राथमिक शिक्षण पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाळेत झाले, तर त्याने सेंट उर्सूला येथून इयत्ता अकरावी-बारावी आणि प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातून बी.कॉम पूर्ण केले. त्यानंतर सीएची तयारी केली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील सिद्धार्थ हा २३व्या वर्षीच सीए झाला आहे. सिद्धार्थ गव्हाणे म्हणाला, ‘सीए होण्यासाठीची प्रेरणा बहीण भावना हिच्याकडून घेतली. त्यानुसार रोज १२-१४ तास अभ्यास करून कोणती ही शिकवणी लावली नाही. त्यामुळे यश मिळाले.’
आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. प्रतिकूल परिस्थिती आहे. आमचा मुलगा सीए झाला खूप आनंद झाला. त्याने प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे आणि चांगल्या कर्माचे फळ परमेश्वराने दिले. - भीमाजी गव्हाणे (वडील)