जागतिक एडस् दिन विशेष: स्वावलंबनातून ‘ती’ची जगण्याची अन् शिक्षणाची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 10:20 PM2017-11-30T22:20:33+5:302017-11-30T22:20:53+5:30

‘ती’ लहान असतानाच आई-वडील सोडून गेले. आजी-आजोबांनी मायेची पाखर दिली. अगदी सातवीपर्यंत तिने कधी शाळेतील पहिला नंबर सोडला नाही अन् अचानक एक दिवशी बातमी आली, की ती एड्स पॉझिटिव्ह आहे. या बातमीने ती पूर्णपणे खचली. आता आजी-आजोबाही थकले असल्याने शेतमजुरी करून जगण्याबरोबरच उच्च शिक्षणासाठी तिची धडपड सुरू आहे. 

World AIDS Day Special: The struggle for survival and learning of self from self-reliance | जागतिक एडस् दिन विशेष: स्वावलंबनातून ‘ती’ची जगण्याची अन् शिक्षणाची धडपड

जागतिक एडस् दिन विशेष: स्वावलंबनातून ‘ती’ची जगण्याची अन् शिक्षणाची धडपड

Next

- हणमंत पाटील 

पिंपरी : ‘ती’ लहान असतानाच आई-वडील सोडून गेले. आजी-आजोबांनी मायेची पाखर दिली. अगदी सातवीपर्यंत तिने कधी शाळेतील पहिला नंबर सोडला नाही अन् अचानक एक दिवशी बातमी आली, की ती एड्स पॉझिटिव्ह आहे. या बातमीने ती पूर्णपणे खचली. आता आजी-आजोबाही थकले असल्याने शेतमजुरी करून जगण्याबरोबरच उच्च शिक्षणासाठी तिची धडपड सुरू आहे. 
पुण्यातील खेड तालुक्यातील एका गावच्या १७ वर्षांच्या तरुणीची ही हलाखीची परिस्थिती आहे. एड्स पॉझिटिव्ह असलेल्या आई-वडिलांना दोन मुली; एक मुलगी निगेटिव्ह असल्याने ती लग्न होऊन सुखाचा संसार करीत आहे. मात्र, ‘ती’ लहान असतानाच आई-वडील एड्सच्या आजाराने मरण पावले. साहजिकच आजी-आजोबांनी तिचा सांभाळ केला. लहानपणापासून ‘ती’ची तब्येत धट्टीकट्टी होती अन् आजही आहे. त्यामुळे कोणालाही तिच्या आजाराविषयी शंका नव्हती. 
गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना पहिला क्रमांक कधी सोडला नाही. गुणवंत विद्यार्थिनी म्हणून सर्व शिक्षकांकडून ‘ती’चे नेहमी कौतुक व्हायचे. त्यामुळे तिच्याशी मैत्री करण्यासाठी अनेक विद्यार्थिनी प्रयत्न करायच्या. शेतीवर अवलंबून असलेल्या आजी-आजोबा व मामाच्या कुटुंबाचीही हलाखीची परिस्थिती होती. मात्र, ‘ती’च्या शैक्षणिक प्रगतीमुळे सर्व मंडळी खूश होते. मात्र, तो दिवस उजाडला. 
सातवीत असताना तिचा खोकल्याचा त्रास वाढला. आजोबांनी तिला दवाखान्यात तपासणीसाठी नेले अन् ती पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर आजोबांच्या पायाखालची वाळू सरकली. पण स्वत:ला सावरत त्यांनी तिला ही गोष्ट हळुवारपणे सांगितली अन् यापुढे तब्येतीची काळजी घेण्याविषयीचा सल्ला दिला. ‘सीआरटी’च्या गोळ्या सुरू करण्यात आल्यानंतर आपल्याला एड्स हा आजार झाल्याचे समजल्यावर तिलाही धक्का बसला. काहीही चूक नसताना ‘ती’ला यातना भोगाव्या लागणार आहेत. त्यामुळे ‘ती’च्या मनाची घुसमट व घालमेल सुरू झाली. साहजिकच त्याचा परिणाम शैक्षणिक प्रगतीवर होऊ लागला. 
‘ती’च्या शाळेला दांड्या वाढल्या. कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. तरीही दहावीला ७५ टक्के मार्क्स मिळाले. मात्र, आता आजी-आजोबा थकून गेल्याने पुढील शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे शेतमजुरी करून तिची शिक्षणाची धडपड सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका महाविद्यालयात तिने बहिस्थ: विद्यार्थी म्हणून कला शाखेत प्रवेश घेतला आहे. दुर्धर आजार अन् उच्च शिक्षणाची दुर्दम्य इच्छा या संकटात ती सापडली आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘ती’ला आज सहानुभूती अन् मदतीची आवश्यकता आहे. 

यश फाउंडेशनचा आधार 
एक वर्षापूर्वी यश फाउंडेशनचे संचालक रवी पाटील, राजू आहेर व सामाजिक कार्यकर्त्या मनीषा परदेशी यांनी ‘ती’चे समुपदेशन करून शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार दिला आहे. सध्या फाउंडेशनमध्ये शिवणकामाचे प्रशिक्षण घेऊन ‘ती’ स्वावलंबनातून पुढील शिक्षण घेण्यासाठी धडपडत आहे. उच्च शिक्षण घेऊन यापुढे एड्स पॉझिटिव्ह मुलांसाठी काम करणार असल्याचे ‘ती’ने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

यश फाउंडेशनने महिंद्रा कंपनीच्या मदतीने खेड तालुक्यातील चाकण परिसरात ‘एचआयव्ही’विषयी जनजागृतीचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह मुलांचे पुनर्वसन, सहजीवन जगणा-या जोडप्यांना स्वावलंबनासाठी प्रशिक्षण, सकस आहार, समुपदेशन व सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
- रवी पाटील, संचालक, यश फाउंडेशन

Web Title: World AIDS Day Special: The struggle for survival and learning of self from self-reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.