जागतिक ग्राहक दिन: फसव्या जाहिरातींपासून सावध रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:17 AM2019-03-15T03:17:48+5:302019-03-15T03:18:06+5:30
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार करताना घ्या काळजी
- प्रकाश गायकर
पिंपरी : ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा. आजच्या जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात हा ग्राहक राजा अतिशय महत्त्वाचा भाग झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी विक्रीचा केंद्रबिंदू आहे. मात्र अनेकदा जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. ग्राहकांनी प्रलोभनांना बळी न पडता आवश्यक त्या वस्तू व सेवा कशा खरेदी कराव्यात, फसवणूक झाली तर कुणाकडे दाद मागावी, यासारख्या अनेक प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी तसेच जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत पिंपरी-चिंचवड प्रमुख रमेश सरदेसाई यांच्याशी केलेली बातचीत.
ग्राहक दिन कधीपासून साजरा होऊ लागला?
- ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले आणि याबाबत जागतिक स्तरावर पाठपुरावाही करण्यात आला. त्याला युनेस्कोकडूनही मान्यता मिळाली.
त्यानुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो. भारतामध्ये २५ डिसेंबर १९८६ रोजी कायदा करण्यात आला. म्हणून २५ डिसेंबर हा दिवस भारतीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
फसवणूक झाल्यानंतर तक्रार कुठे करावी ?
- ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार आहे. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्राहक न्यायालय कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एक शहरी भागासाठी व दुसरे ग्रामीण भागासाठी असे दोन ग्राहक न्यायालये आहेत.
तक्रार करताना काय काळजी घेतली पाहिजे?
- ग्राहकांनी लिखित स्वरूपात तक्रार करावी. तक्रार निवारण केंद्रामध्ये तक्रार देत असताना दोन प्रती लिखित स्वरूपात तयार कराव्यात. एक प्रत जमा करून दुसऱ्या प्रतीवर कार्यालयाचा शिक्का, अधिकृत सही, दिनांक व वेळ लिहून घ्यावी. जेणेकरून भविष्यामध्ये जर तक्रार गहाळ झाली तर आपण आपल्याकडची प्रत दाखवून दाद मागू शकतो.
ग्राहक सरंक्षण कायद्यानुसार कायदेशीर ग्राहकत्व कधी प्राप्त होते?
- कुठलीही वस्तू अथवा सेवा घेतली असेल तर त्याचे पक्के बिल ग्राहकाकडे पाहिजे. जीएसटी नंबर त्यामध्ये नमूद केलेला पाहिजे. पावतीवर क्रमांक पाहिजे. तसेच घेतलेल्या मालाचे वर्णन, किंमत पावतीवर नमूद पाहिजे, अशी पावती असेल तरच कायदेशीरपणे ग्राहक सरंक्षण न्यायालयात दाद मागता येते.
आॅनलाइन वस्तू खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
- आॅनलाइन वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांनी सावधानता बाळगायला हवी. ज्या कंपनीकडून फसवणूक झाली असेल त्या कंपनीकडे पहिल्यांदा तक्रार करावी. त्यानंतर ग्राहकांनी ग्राहक न्यायालय किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी.
जाहिरातींच्या माध्यमातून अनेकवेळा फसवणूक केली जाते. जाहिरातीपासून कसे सावध राहावे?
- प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधनाच्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती केल्या जातात. अमूक एखाद्या क्रीमने गोरे व्हाल, त्वचा उजळेल अशा जाहिराती आपल्याला सर्रास पाहयला मिळतात. मात्र आजपर्यंत असे कुठलेही औषध नाही की ज्याने माणूस गोरा होईल. अशा जाहिरातींविरोधात ग्राहक मंचाने आवाज उठवला होता. त्यानुसार अशा जाहिरात करणाºया कंपन्या आणि जाहिरातीमध्ये काम करणाºया कलाकारांवर कारवाई केली जाईल, अशा पद्धतीचा कायदा मांडण्यात आला होता. मात्र तो काही कारणास्तव संसदेमध्ये पारित होऊ शकला नाही.
सदनिका घेताना अनेकवेळा ग्राहकांची फसवणूक होते. घर घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे?
- सदनिका घेताना बिल्डरशी करायचा करार आपल्या वकिलाला दाखवला पाहिजे. त्या करारामध्ये बिल्डरचे व आपले नाव, पत्ता समाविष्ठ पाहिजे. करारामध्ये नमूद केलेला फ्लॅटचा ‘कारपेट एरिया’ फ्लॅट ताब्यात घेताना अधिकृत अभियंत्याकडून मोजून घ्यावा. त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही.
ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांना काय आवाहन कराल?
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्याची संपूर्ण माहिती मोफत स्वरूपात दिली जाते. त्याचा सगळ्या ग्राहकांनी लाभ घ्यावा. वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडताही तीच वस्तू असल्याचे नीट पारखून घ्या. ग्राहकांना संरक्षणाचा, माहिती मिळवण्याचा, निवड करण्याचा अधिकार आहे. अनेकदा खरेदी करताना किंवा सेवेचा वापर करताना ग्राहक बºयाच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच फायदा विक्रेते घेतात. त्यामुळे ‘जागो ग्राहक जागो’