‘दुनिया झुकती है’चा प्रत्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:49 AM2017-08-01T03:49:48+5:302017-08-01T03:49:48+5:30
पवना नदीपात्रात काळेवाडी पुलाखाली कोणी मगर दिसल्याचे सांगू लागले आहे़, तर कोणी मोठ्या आकारातील अजगर असल्याची अफवा पसरवत आहे.
पिंपरी : पवना नदीपात्रात काळेवाडी पुलाखाली कोणी मगर दिसल्याचे सांगू लागले आहे़, तर कोणी मोठ्या आकारातील अजगर असल्याची अफवा पसरवत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून पिंपरीतील काळेवाडी पुलावर बघ्यांची मोठी गर्दी जमू लागली आहे.
भर पावसातही लोक तासन्तास पुलावर थांबत आहेत. अफवेमुळे एखाद्यावेळी गर्दी होऊ शकते. मात्र सलग दुसºया दिवशीही त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी होऊ लागल्याने बिनकामाच्या लोकांचे हे उद्योग असल्याची चर्चा शहरात आहे.
पवना धरणातून सलग दोन दिवसांपासून नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदी दुधडी भरून वाहत आहे. पुलावरून येणारे जाणारे पुलावरून खाली पाहातात. काही टवाळखोर तेथे थांबून नदीपात्रात मगर दिसल्याचे येणाºया जाणाºयांना सांगतात. त्यामुळे कुतुहलापोटी पुलावरून ये-जा करणारे पुलावर थांबून खाली नदीपात्रात काही दिसते का हे पाहाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पाहुन अन्य लोकही पुलावर येऊन थांबतात. त्यामुळे दोन दिवसांपासून या पुलावर वर्दळ वाढली आहे. बघ्यांची गर्दी वाढत असताना, व्हॉट्सअॅपवर नदीपात्राची छायाचित्र पाठवल्याने उत्सुकतेपोटी अनेक जण काळेवाडी पुलाकडे धाव धेऊ लागले आहेत.
नदीपात्रात मगर दिसून आल्याची अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये़ कोणीही पुलावर गर्दी करू नये, असे अवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.