सणाच्या तोंडावर संसार आला उघड्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:39 AM2018-10-26T01:39:26+5:302018-10-26T01:39:29+5:30
चिंचवड येथील दळवीनगर परिसरातील झोपडपट्टीला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत सहा झोपड्या खाक झाल्या.
पिंपरी : चिंचवड येथील दळवीनगर परिसरातील झोपडपट्टीला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत सहा झोपड्या खाक झाल्या. मेहनत करून जमवलेले संसारोपयोगी साहित्य ऐन सणासुदीच्या तोंडावर बेचिराख झाल्याने झोपडीधारकांच्या डोळ्यांमधील अश्रू थांबत नव्हते. घरातील सर्वच साहित्य खाक झाल्यामुळे संसार उघड्यावर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
एका झोपडीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने सहा झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यामध्ये घरातील कपड्या-भांड्यापासून सर्वच साहित्य जळाले. दिवाळीसाठी मुला-बाळांसाठी खरेदी केलेले कपडे जळाल्याने आगीत राख झालेल्या साहित्याकडे केविलवाण्या नजरेने पाहण्याची वेळ झोपडीधारकांवर आली आहे. झोपडीतील भांडी, किराणा खाक झाला आहे. डोक्यावरील छप्पर तर नाहीसे झालेच आहे, मात्र फक्त अंगावरील कपडे सोबत असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
आगीत ज्यांची झोपडी जळाली त्या सुनंदा जाधव म्हणाल्या, ‘‘पै पै कमवून ४० हजार रुपये साचवले होते. दोन तोळे सोनं होतं. पण या आगीच्या लोळामध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही. दिवाळीच्या सणासाठी भरलेला किराणा जळून गेला आहे. आग लागली म्हणून आज बघायला व विचारायला सगळे येतील. मात्र, उद्यापासून आम्ही कुणाकडे काय मागणार? आमचा फक्त जीव वाचला आहे. पण आम्हाला जगण्यासाठी आता काहीच शिल्लक राहिलं नाही.’’
रमाबाई जाधव म्हणाल्या, ‘‘माझी तीन मुलं, दोन सुना आणि आम्ही दोघं नवरा-बायको या तीन झोपड्यांमध्ये राहत होतो. रात्री अचानक आग लागल्याने घराबाहेर पळालो. आग इतकी मोठी होती, की घरातील काहीच साहित्य बाहेर काढता आलं नाही. घरात ठेवलेलं पैशाचं पाकीट पाह्यलाही मिळालं नाही. घरातील धान्य, बाजार सगळ्याचीच राख झाली.
स्थानिक नेत्यांनी अजूनही आमच्याकडं लक्ष दिलं नाही. आमच्या सर्वच जीवनावश्यक वस्तूंची राख झाली आहे.’’
>तरुणांच्या तत्परतेने मोठी हानी टळली
पहाटे तीन ते चारच्या सुमारास आग लागल्यानंतर स्थानिक तरुणांनी एकत्र येत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र आग मोठी आहे, ती सहजासहजी विझणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी बाजूच्या झोपड्यांमधील गॅस सिलिंडर झोपड्यांबाहेर काढण्यास सुरुवात केली. अर्ध्या तासामध्ये ३० ते ३५ सिलिंडर तरुणांनी रेल्वे रुळाच्या पलीकडे नेऊन ठेवले. त्यामुळे पुढे होणारी हानी टळली.झोपडपट्टी भाग असल्याने अग्निशामक दलाच्या गाड्या आगीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठा अडथळा येत होता. आग विझवण्यासाठी तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. झोपडपट्टीच्या मागील बाजूने सुमारे पंधरा फूट उंचीची भिंत आहे. त्यावर चढून जवानांनी आग विझवली.