चुकीची शस्त्रक्रिया; अधीक्षकांवर कारवाई?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:32 AM2018-04-02T03:32:13+5:302018-04-02T03:32:13+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका रुग्णाच्या पायावर चुकीची शस्त्रक्रिया झाल्यांनतर हलगर्जीपणाचा ठपका ठेवलेल्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना महापालिका आयुक्तांनी ताकीद दिली आहे. यापुढे कर्तव्यात कसूर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका रुग्णाच्या पायावर चुकीची शस्त्रक्रिया झाल्यांनतर हलगर्जीपणाचा ठपका ठेवलेल्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना महापालिका आयुक्तांनी ताकीद दिली आहे. यापुढे कर्तव्यात कसूर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शस्त्रक्रियेचा प्रोटोकॉल त्वरित तयार करावा. त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.
संत तुकारामनगर येथे महापालिकेचे यशंवतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. रुग्णालयात बाळासाहेब देडगे या रुग्णाच्या पायावर १६ सप्टेंबर २०१५ रोजी शस्त्रक्रिया केली होती. ही शस्त्रक्रिया चुकीची झाली. तसेच या शस्त्रक्रियेनंतर गँगरिन झाल्याने अवयवछेदन केले. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार, चौकशी समिती नेमली होती. या समितीने २२ मार्च २०१६ ला सादर केलेल्या अहवालात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांनी रुग्णालयप्रमुख म्हणून कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवला. त्यानुसार २१ एप्रिल २०१६ रोजी डॉ. देशमुख यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीत रुग्णालयप्रमुख म्हणून डॉ. देशमुख यांच्या रुग्णालयावर प्रभावी नियंत्रण नसल्याच्या किंवा कर्तव्यात कसूर झाल्याच्या बाबी समोर आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप सिद्ध होत नाहीत, असा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी सादर केला.
आरोग्य वैद्यकीय अधिकाºयांनीही दोषारोप सिद्ध होत नसल्याने कारवाई करणे उचित होणार नाही, असा अभिप्राय दिला.
त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश जारी केला आहे. त्यामध्ये डॉ. देशमुख यांनी सर्जरी युनिट प्रमुखांची आॅपरेशन लिस्टवर नोटीस आणि स्वाक्षरी नसतानाही मान्यतेविना शस्त्रक्रियेस परवानगी दिली. तसेच रुग्णालय प्रमुख म्हणूनही त्याचे प्रभावी नियंत्रण दिसून येत नाही. शस्त्रक्रियेच्या प्रोटोकॉलचेही त्यांनी पालन केले नाही. त्यामुळे डॉ. देशमुख यांना आयुक्तांनी सक्त ताकीद दिली आहे. शस्त्रक्रियेचा प्रोटोकॉल त्वरित तयार करावा.