येलघोल शाळेची हॅट्ट्रिक
By admin | Published: January 24, 2017 02:03 AM2017-01-24T02:03:20+5:302017-01-24T02:03:20+5:30
जिल्हा परिषद आयोजित कै. यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवात तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या येलघोल
काले : जिल्हा परिषद आयोजित कै. यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवात तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या येलघोल शाळेने खो-खोमध्ये मुले व मुलींच्या दोन्ही गटांत सलग तिसऱ्याही वर्षी विजेतेपदाचा मान पटकाविला. माळवाडी प्राथमिक शाळेत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पवनानदीच्या कुशीत वसलेले आठशे-नऊशे लोकसंख्येचे येलघोल हे दुर्गम गाव. गावातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या शाळेतील चपळ मुला-मुलींमध्ये खो-खो खेळाची आवड शाळेचे शिक्षक घोडके यांनी निर्माण केली. तत्कालीन मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने २०१२-१३ पहिल्यांदा तालुक्यात खो-खो या खेळात बाजी मारली. नंतर यशस्वी परंपरा कायम ठेवत शाळेने मुले-मुली दोन्ही गटांत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
या वर्षी शाळेने खो-खो मध्ये दुहेरी यश मिळविले लंगडी स्पर्धेत शाळेचा मुलींचा संघ उपविजेता ठरला. रसिका वाजे (१००मी. धावणे प्रथम), ऋतुजा दातीर (उंच उडी, द्वितीय), तनुजा घारे (लांब उडी, तृतीय) यांनीही वैयक्तिक क्रीडा प्रकारात बाजी मारली.
बक्षीस वितरण तालुक्याचे शिक्षण विस्ताराधिकारी भैरवनाथ टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक जालिंदर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक नवनाथ कांबळे, कुंडलिक शिंदे, अमित सारडा, किशोर चव्हाण यांनी खो-खोविषयक मार्गदर्शन केले.शाळेच्या यशाबद्दल शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)