पिंपरी-चिंचवडकरांची वर्षाची पाण्याची चिंता मिटली; पवना धरण ८४ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:12 AM2023-07-31T11:12:09+5:302023-07-31T11:18:54+5:30

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्रोत आहे...

Year's water worries of Pimpri-Chinchwadkars solved; Pavana Dam is 84 percent full | पिंपरी-चिंचवडकरांची वर्षाची पाण्याची चिंता मिटली; पवना धरण ८४ टक्के भरले

पिंपरी-चिंचवडकरांची वर्षाची पाण्याची चिंता मिटली; पवना धरण ८४ टक्के भरले

googlenewsNext

पिंपरी : पंधरा दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण ८४ टक्के भरले आहे. वर्षभर पुरेल एवढा साठा आहे. मात्र, महापालिकेचा पाणीपुरवठा दिवसाआडच कायम राहणार आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्रोत आहे. पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता. मावळातील आंद्रा, वडिवळे, टाटा या छोट्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती. गेल्या पाच दिवसांपासून पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. जोरदार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. १ जूनपासून धरण परिसरात १ हजार ७६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर पाणीसाठ्यात ६६.०९ टक्क्यांनी वाढ झाली. धरणातील पाणीसाठा ८३.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला असून, आता शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे. गेल्या २४ तासांत ४५ मिलीमीटर पाऊस पडला आहे, तर रविवारी पावसाचा जोर काहीसा कमी दिसून आला. मात्र, धरण क्षेत्रात अधिक पाऊस पडत आहे.

साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा

समान पाणीवाटप धोरण कायम ठेवून महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. काही दिवसांसाठीची पाणीकपात महापालिका प्रशासनाने अनिश्चित काळासाठी कायम ठेवली. साडेतीन वर्षे झाले, तरी पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआडच पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. दररोज पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी आहे. दुसरीकडे एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहे. पाण्याच्या तक्रारींच्या संख्येतदेखील घट झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

गेल्यावर्षीपेक्षा तीन टक्के पाणीसाठा अधिक

गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत १५८५ मिलीमीटर पाऊस पडला होता, तर धरण ८१ टक्के भरले होते. यंदा हा पाऊस १७६८ मिलीमीटर पडला आहे. गेल्यावर्षीपेक्षा तीन टक्के पाऊस अधिक आहे. शेवटी सुरू होऊनही संततधार अधिक असल्याने धरण भरण्याचा वेग वाढला आहे.

धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक

पवना धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. महापालिका दिवसाला ५८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा करत आहे. दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नियमित पाणीपुरवठ्याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा करून निर्णय घेणार आहोत.

-श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता.

Web Title: Year's water worries of Pimpri-Chinchwadkars solved; Pavana Dam is 84 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.