मावळात वातावरण झाले योगमय 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 12:53 PM2019-06-22T12:53:34+5:302019-06-22T13:05:06+5:30

प्राथमिक शाळांसह इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

Yoga day in maval | मावळात वातावरण झाले योगमय 

मावळात वातावरण झाले योगमय 

Next
ठळक मुद्देसुदृढ आरोग्यासाठी नियमित योगासने  करण्याची सर्वांना शपथविद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून योगाबाबत केली जनजागृती

किवळे : महापालिकेच्या विकासनगर, किवळे व रावेत येथील प्राथमिक शाळांसह मामुर्डी येथील इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवारी उत्साहात साजरा  करण्यात आला. विकासनगर व किवळे येथील महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी नियमित योगासने  करण्याची शपथ घेतली. 
विकासनगर येथील हभप मल्हारराव तरस प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात शिक्षकांच्या  मार्गदर्शनाखाली सकाळाच्या वेळीतील वर्गांसाठी सकाळी सात ते आठ व दुपारच्या वर्गांसाठी दुपारी योगासने घेण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. योग प्रात्यक्षिकासाठी शिक्षकांनी  संयोजन केले.  विकासनगर  येथील महापालिकेच्या शाळेतील  विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली. त्यांनतर सुदृढ आरोग्यासाठी नियमित योगासने  करण्याची सर्वांना शपथ देण्यात आली. मुख्याध्यापिका सुनंदा खेडेकर,  व सहकारी शिक्षकांनी संयोजन केले. 
रावेत गावठाण येथील महापालिका शाळा क्रमांक ९७ येथे योगाभ्यास घेऊन योगाची उपयुक्त माहिती सांगण्यात आली. विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांनी रावेत गावातून प्रभातफेरी काढून योगाबाबत जनजागृती केली. मुख्याध्यापक साहेबराव सुपे व शिक्षकांनी सहभाग घेत सर्व कार्यक्रमाचे संयोजन केले. 
किवळे गावठाण  येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत सकाळ व दुपारच्या वेळेत योगासने घेण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना योग दिनाचे  महत्त्व सांगून व योगासने करून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका सुनंदा अस्वार यांनी संयोजन केले.  

तळेगावमध्ये योगदिन 
तळेगाव दाभाडे : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचालित पैसा फंड प्राथमिक शाळेत जागतिक योगदिन  उत्साहात साजरा   करण्यात आला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका अनिता लादे यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील योग साधनेचे महत्त्व  सांगितले.  प्राणायम, योगासने व सूर्यनमस्कार याविषयी  ज्योती दुर्गे यांनी प्रात्यक्षिक सादर  केले.

विद्यार्थ्यांचा सहभाग
चांदखेड : येथील न्यू इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच परिसरातील कुसगाव, पुसाणे, पाचाणे, दिवड, ओव्हळे, डोणे, आढले बुद्रुक, आढले खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.
चांदखेड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीसुद्धा योग केला. यामध्ये सूर्यनमस्काराबरोबर इतर योगासने व प्राणायाम करण्यात आले. योगासने फक्त योगदिनी करण्याची क्रिया नसून रोजच केले पाहिजे यासाठी योगाचे मनुष्याच्या जीवनात असणारे फायदे यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. ई. भोसले यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यालयाच्या शिक्षिका एस. आर. पवार, एस. पी. भोये, एम. डी. हांडे,  युवराज शेलार, टी. व्ही. विरणक आदींनी परिश्रम घेतले़ 

कांतिलाल शहा विद्यालयामध्ये
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या कांतिलाल शहा विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुमन रावत यांनी योगासने करण्याचे महत्त्व सांगितले. शिक्षिका अर्चना मुरुगकर यांनी गुरुचे स्मरण करून पतंजली योगासन प्रार्थना म्हटली व योगासने कशी करावीत, याचे मार्गदर्शन केले. शिक्षिका सोनाली होमकर, सुलोचना इंगळे व दहावीच्या चार विद्यार्थिनींनी व्यासपीठावर योगासनाची प्रात्यक्षिके दाखविली. त्यानुसार शाळेच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी प्राणायाम व विविध योगासने केली. 
तसेच प्राणायाममध्ये अनुलोम-विलोम, भ्रामरी व ध्यानमुद्रामध्ये ओंकार, गायत्री मंत्र व शांती मंत्रांचे पठण करण्यात आले.
 देहूरोड येथील वैश्य समाज मंदिर येथे बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल यांच्यावतीने झालेल्या कार्यक्रमात व्यापारी बंधू व नागरिकांनी सहभाग घेतला. वैश्य समाज महिला मंडळ व युवक संघटनेने संयोजन केले. श्री शिवाजी प्राथमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेण्यात आली. योग्य प्रशिक्षक रुचिका भोंडवे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका धनश्री जाधव व सहकारी शिक्षकांनी संयोजन केले.  

चिंचोली येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा शीतल हगवणे, बोर्ड सदस्य ललित बालघरे यांच्यासह मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी योगासने केली. देहूरोड,  मामुर्डी, किन्हई येथील  मराठी माध्यमाच्या  प्राथमिक शाळा, देहूरोड  एमबी कॅम्प येथील उर्दू हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा येथे आयोजित योग दिनाच्या  कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध माध्यमांच्या सर्व शाळांसह तसेच परिसरातील विविध खासगी शाळांमध्येही योगासने  करून योगाची  माहिती जाणून घेत पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देहूरोड येथील महात्मा गांधी प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. आर्ट आॅफ लिव्हिंगचे  शिवानी  भोंग, जालिंदर पवार, जयपाल गजांकुश, सहादू जाधव, रमेश तेलगू, रवींद्र कुकडे  यांच्या मार्गदर्शनाखाली ४७ मिनिटांत एकवीस योगासने घेण्यात आली. मावळ तालुक्यातील संस्था, संघटनेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.     
............
कामशेतमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 
कामशेत येथे पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान न्याय, मावळ यांच्या माध्यमातून नि:शुल्क योग प्राणायाम शिबिर घेण्यात आले. तीनदिवसीय शिबिरात पहिल्या दिवशी योगशिक्षक आचार्य वीरेंंद्रजीमहाराज यांनी मार्गदर्शन करीत योगासने आपल्या जीवनात किती महत्त्वपूर्ण आहेत, याची माहिती उपस्थितांना दिली.योगासने करण्याचा उत्साह या एकाच दिवसापुरता मर्यादित न ठेवता कायम राहावा. योगाभ्यासाच्या माध्यमातून शिक्षित, सुसंस्कृत आणि स्वस्थ विद्यार्थी घडवण्याचे मार्गदर्शन शिक्षकांनी केले. नेसावे येथे अंगणवाडी सेविका अनिता कुटे यांनी विद्यार्थ्यांकडून योग करून घेतले. यावेळी नागरिक उपस्थित होते. 

Web Title: Yoga day in maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.