तुम्हीच सांगा, आम्ही शाळेत जायचं कसं? विद्यार्थ्यांना तुडवावी लागते चिखलवाट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 12:07 AM2018-10-02T00:07:49+5:302018-10-02T00:08:40+5:30
पवनानगर : काले कॉलनीतील चिखलमय रस्त्यातून विद्यार्थ्यांना तुडवावी लागते वाट
पवनानगर : काले कॉलनी येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने या ठिकाणाहून लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी अंगणवाडी ते चौथीपर्यंतचे वर्ग असून, काले कॉलनी परिसरातील मोठ्या पटसंख्येची असून शाळेची पटसंख्या ९५ इतकी आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी रोज येत असतात. परंतु या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
त्या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. त्यामुळे लहान लहान विद्यार्थ्यांना पालक कडेवर उचलून शाळेत सोडतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परंतु रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा काले-पवनानगर ग्रुप ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार करूनदेखील रस्त्यावर खड्डे बुजवले नसल्याचे दिसून येत आहे. मुलांना चिखलातून वाट शोधत शाळेत जावे लागत आहे.
पवनानगर ही शाळा पवनमावळ परिसरातील सहा केंद्राची बिट शाळा आहे. तरी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व पालकांनी अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामपंचायतकडे केली असून, त्याकडे लक्ष देण्याची मागणी पालक व शिक्षक करत आहेत.
रस्त्याचे काम हे पावसाळा संपल्यावर लवकरात लवकर
करणार असून रस्त्यासाठी तीन लाखांचा ग्रामपंचायतीचा फंड वापरुन विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता लवकरात लवकर करण्यात येणार आहे. - वैशाली आढाव, सरपंच
मी अनेकदा याबाबत ग्रामपंचायतीकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे व याबाबत जिल्हा परिषद, पुणे यांच्याकडे पण रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर खड्ड्यामुळे त्रासाला सहन करावा लागत असते.
- सतीश रुपनवर, मुख्याध्यापक