आमचा सन्मान करण्यापेक्षा तुम्हाला सन्मानाने जगता आले पाहिजे : शरद पवार

By प्रकाश गायकर | Published: October 2, 2023 06:56 PM2023-10-02T18:56:12+5:302023-10-02T18:57:16+5:30

भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठा संघाच्या वतीने सन्मान....

You should be able to live with dignity rather than honoring us: Sharad Pawar | आमचा सन्मान करण्यापेक्षा तुम्हाला सन्मानाने जगता आले पाहिजे : शरद पवार

आमचा सन्मान करण्यापेक्षा तुम्हाला सन्मानाने जगता आले पाहिजे : शरद पवार

googlenewsNext

पिंपरी : भारतीय भटक्या विमुक्त संघाच्या वतीने आज माझा सन्मान करण्यात आला. मात्र, याठिकाणी सन्मान होणार आहे याची माहिती नव्हती. आताच्या परिस्थितीत आम्हा राजकारण्याचा सन्मान करण्याची वेळ नाही तर तुम्हाला या देशामध्ये सन्मानाने कसे राहता येईल, याबाबत ठोस काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी केले. 

भारतीय भटक्या विमुक्त प्रतिष्ठा संघाच्या वतीने शरद पवार यांचा दापोडी येथे आयोजित कार्यक्रमात मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यापूर्वी शरद पवार यांच्यावर पुष्पवृष्टी करत दापोडी येथील चौकामध्ये  त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या हस्ते शरद पवार यांना मानपत्र देत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संघाचे कार्याध्यक्ष शिवराज जाधव, भारत जाधव, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, काशिनाथ नखाते आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “भटक्या विमुक्त जातींबाबत काम करण्यासाठी लोक पुढे येत आहेत ही आनंदाची बाब आहे. मात्र आपले राज्यकर्ते जागरुक आहेत का? राज्यकर्त्यांचा या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. एक काळ होता भटक्या लोकांना गुन्हेगार ठरवले जात होते. त्यांना तारेच्या कुंपणात डांबून ठेवले जात होते. पंडीत जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सोलापूर येथे जात कुंपणामध्ये असलेल्या लोकांना सोडत विमुक्त केले.” 

गेल्या अनेक वर्षांपासून संसदेत जातनिहाय जनगणनेची मागणी करत असल्याचे सांगत पवार म्हणाले, “आज या देशामध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत, याची माहिती नाही. त्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत आहोत. तसे झाले तर विमुक्त लोकांना न्याय देता येईल.”

Web Title: You should be able to live with dignity rather than honoring us: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.