Corona Vaccination: दुसऱ्या डोसनंतर 2 दिवसांत तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 19:39 IST2021-10-03T19:38:38+5:302021-10-03T19:39:21+5:30
हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात नमूद

Corona Vaccination: दुसऱ्या डोसनंतर 2 दिवसांत तरुणाचा मृत्यू
पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर, घरी आराम करीत असलेल्या तरुणाला त्रास होऊ लागला. त्यात तो बेशुद्ध झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चिखली येथे रविवारी (दि. ३) सकाळी ही घटना घडली. आकाश विलास कोरे (वय २५, रा. धर्मराजनगर, चिखली), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आकाश याने १ ऑक्टोबर २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे त्याला त्रास होऊ लागल्याने तो घरीच आराम करीत होता. रविवारी (दि. ३) सकाळी आठच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यात तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. हृदयविकाराने आकाश यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात नमूद केले आहे. मयत आकाश यांचा भाऊ सूरज कोरे यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.