लॉजमध्ये इंजिनियर तरुणीचा गोळ्या झाडून प्रियकराकडून खून; हिंजवडी आयटी पार्कमध्ये खळबळ
By नारायण बडगुजर | Published: January 28, 2024 10:47 PM2024-01-28T22:47:50+5:302024-01-28T22:50:02+5:30
प्रेम संबंधातून प्रियकराने तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर गोळ्या झाडल्या.
पिंपरी : प्रेम संबंधातून प्रियकराने तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील मारुंजी रस्त्यावरील हॉटेल एलिगंन्ट ओयो टाउनहाऊसमध्ये रविवारी (दि. २८) सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे हिंजवडी आणि आयटी पार्क परिसरात एकच खळबळ उडाली.
वंदना के. द्विवेदी (२६, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ राजेश निगम (रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ निगम आणि वंदना यांचे घर लखनऊ येथे एकाच परिसरात आहे. त्यामुळे त्यांची जुनी ओळख असून, ऋषभ हा वंदना हिचा प्रियकर आहे. मागील काही वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. साॅफ्टवेअर इंजिनियर असलेली वंदना ही २०२२ मध्ये हिंजवडी येथे नोकरीनिमित्त आली. हिंजवडीतील एका आयटी कंपनीत ती नोकरीला होती.
दरम्यान, ऋषभ हा गुरुवारी (दि. २५) लॉजमध्ये गेला. तर वंदना ही शुक्रवारी (दि. २६) लाॅजमध्ये गेली. तेथे शनिवारी (दि. २७) रात्री पावणेदहाच्या सुमारास ऋषभ याने वंदना हिच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर ऋषभ पळून गेला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हाॅटेलच्या व्यवस्थापकाकडे असलेल्या मास्टर चावीने पोलिसांनी खोलीचे कुलूप उघडले. त्यावेळी वंदनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात
वंदना हिचा खून केल्यानंतर ऋषभ शनिवारी रात्री दहाच्या सुमारास लाॅजमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याने मुंबई गाठली. त्याने गोळीबार करून खून केल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पळून जाणाऱ्या ऋषभ याला ताब्यात घेतले. दरम्यान, ऋषभ याला ताब्यात घेण्यासाठी हिंजवडी पोलिसांचे पथक मुंबई येथे रवाना झाले.
पाच गोळ्या झाडूनही खबर नाही
ऋषभ याने वंदना हिच्यावर पाच गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. गोळीबार केल्यानंतर ऋषभ अतिशय शांतपणे लाॅजच्या खोलीमधून निघून जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. मात्र, पाच गोळ्या झाडूनही लॉजमध्ये कोणालाही खबर लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लखनऊ येथे झाली होती ओळख
ऋषभ आणि वंदना यांची लखनऊ येथे ओळख झाली होती. ऋषभ हा लखनऊ येथील रहिवासी आहे. दरम्यान, २५ जानेवारी रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास त्यांनी लक्ष्मी चौक, मारुंजी येथील लॉजमध्ये रूम घेतली होती. त्यांच्यात काही कारणामुळे वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबई पोलिसांनी कळविल्यानंतर प्रकार उघडकीस
ऋषभ निगम याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने वंदना हिचा खून केल्याचे सांगितले. याबाबत मुंबई पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली.
खुनाचे कारण अस्पष्ट
हिंजवडी पोलिसांनी वंदनाच्या कुटुंबियांना घटनेबाबत माहिती दिली. तसेच वंदना आणि ऋषभ यांच्यातील संबंधांबाबत विचारणा केली. मात्र, कुटुूंबियांनी अद्याप काहीही सांगितले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच ऋषभ याने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी खून का केला, याबाबत त्याने काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.