Online fraud: नौदलातील तरुणाला तब्बल '२ लाखांचा' गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 12:55 PM2021-10-03T12:55:50+5:302021-10-03T12:55:59+5:30
ऑनलाइन खरेदीसाठी दोन जणांना दोन लाख १५ हजार ३०० रुपये पाठवूनही त्यांनी साहित्य दिले नाही
पिंपरी : नौदलातील एका तरुणाने ऑनलाइन खरेदीसाठी दोन जणांना दोन लाख १५ हजार ३०० रुपये पाठवूनही त्यांनी साहित्य दिले नाही. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. भारतीय नौसेनेच्या लोणावळा येथील आवारात १४ जुलै ते १० ऑगस्ट २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
मयुर शिरीष कोल्हे (वय २३, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी शनिवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अर्णव (पूण नाव, पत्ता माहिती नाही) आणि आयुष यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयुर हे नौदलात आहेत. ते लोणावळा येथे कर्तव्यावर असताना त्यांनी कुठेतरी ऑनलाइन जाहिरात पाहून संशयित आरोपींना फोन केला. त्यांनी मयुर यांना दोन महागडे मोबाइल फोन आणि हेडफोन देण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी मयुर यांना दोन लाख १५ हजार ३०० रुपये संशयित आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या खात्यावर पाठविले. मात्र पैसे दिल्यानंतरही संशयित आरोपींनी त्यांना साहित्य दिले नाही. सदरचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यातून लोणावळा पोलिसांकडे तपासाकरिता वर्ग करण्यात येणार असल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले.