तरुणाने घातली श्वानांच्या अंगावर गाडी, एकाचा मृत्यू तर २ जखमी; वन्यजीवप्रेमी नागरिकांमुळे घटना उघडकीस
By विश्वास मोरे | Published: June 14, 2024 04:18 PM2024-06-14T16:18:49+5:302024-06-14T16:19:49+5:30
सोसायटीतून कार बाहेर घेऊन जात असताना श्वानांना चिरडले याचा व्हिडीओ पोलिसांना मिळाल्यानंतर मारुंजीत एकावर गुन्हा दाखल केला...
पिंपरी : पोर्शे अपघातानंतर सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सोसायटीतून कार बाहेर घेऊन जात असताना श्वानांना चिरडले याचा व्हिडीओ पोलिसांना मिळाल्यानंतर मारुंजीत एकावर गुन्हा दाखल केला आहे. वन्यजीवप्रेमी नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला. लाईफ रिपब्लिक, कोलते पाटील सोसायटीत येथे १० जून रोजी घडली.
राणाप्रताप रामदास भट्टाचार्य (वय ३४, रा. लाईफ रिपब्लिक, कोलते पाटील, मारुंजी) यांनी या प्रकरणी १३ जून रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शंतनु जयसिंग करांडे (वय २७, रा. लाईफ रिपब्लिक, कोलते पाटील, मारुंजी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोसायटीतून कार बाहेर घेऊन जात असताना रस्त्यावर श्वानांचा एका घोळका बसला होता. आरोपीने हयगयीने कार चालवत त्यांच्या अंगावर घातली. या अपघातात दोन श्वान गंभिर जखमी झाले तर, एक श्वानाचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती मिळताच सोसायटीतील नागरिक आणि काही प्राणी प्रेमी नागरिकांनी फिर्याद दिली.
व्हिडिओमुळे गुन्हा दाखल -
संबंधित आरोपीने कशा पद्धतीने सोसायटी बाहेर कार घेतली, श्वानांच्या अंगावर कशी कार घातली, याचा व्हिडिओ फिर्यादींनी पोलिसांना उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला दिला चोप?
आरोपीने कार श्वानांच्या अंगावर घातल्यानंतर काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी आरोपीला कारच्या बाहेर घेत चोप दिल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी मारहान केल्याचा तक्रार अर्ज आरोपीने केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.