तरुणांनो व्यसनाला ठेवा दूर; ‘संकल्प नशामुक्ती' विशेष मोहीम, पुणे पोलिसांकडून मोफत मॅरेथॉन
By दीपक होमकर | Published: May 30, 2023 02:31 PM2023-05-30T14:31:47+5:302023-05-30T14:38:32+5:30
अलीकडच्या काळात मद्यपान, ड्रग्ज् आदी गोष्टींनी मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे, त्याला वेळीच आवर घालण्यासाठी ‘संकल्प नशामुक्ती'
पुणे : महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या लोणावळ्याला व्यसनाचे गालबोट लागले आहे, ते दूर करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘संकल्प नशामुक्ती’ ही विशेष मोहीम सुरु केली असून त्याअंतर्गत व्यसनमुक्तीच्या जनजागृतीच्या निमित्ताने येत्या रविवारी (४ जून) मॅरेथॉनचे आयोजन केले आहे, या संपूर्ण अभियानासाठी अभिनेते सुनील शेट्टी यांनी पाठिंबा दिला असून मॅरेथॉनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती लोणावळा उप विभागीय पोलिस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी दिली.
मॅरेथॉनमध्ये लहान मुलांसाठी एक गट, अठरा ते पंचवीस वर्षांचा दुसरा गट आणि २५ च्या पुढे तिसरा गट अशा तीन गटांमध्ये ही मॅरेथॉन होणार आहे. सहभागी प्रत्येक स्पर्धकांना टी-शर्ट, गुडी बॅग देण्यात येणार आहे. लोणावळा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही मॅरेथॉन होणार असून विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून पुणे ग्रामीण पोलिसांच्या वेबसाईटवर ( https://puneruralpolice.gov.in/) नोंदणीची लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री पर्यंत नोंदणी सुरु राहणार आहे. रविवारी सकाळी सहा वाजता दाउदी बोहरा ग्राउंड, लोणावळा येथून मॅरेथॉन सुरु होणार आहे.
नागरिकांनी यामध्ये अधिक संख्येने सहभागी व्हावे
पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी आणि पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना सुरक्षित वाटावे यासाठीचा हा प्रयत्न आहे. यामध्ये युवकांचा सहभाग आहेच तो वाढावा यासाठी पुणे-पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांनी यामध्ये अधिक संख्येने सहभागी व्हावे. - अंकित गोयल, पोलिस अधीक्षक, पुणे
व्यसनाला आवर घालण्यासाठी ‘संकल्प नशामुक्ती’
लोणावळा हे पर्यटस्थळ महाराष्ट्रातील तमाम तरुणांचे पर्यटनासाठीचे खास स्थळ आहे पण अलीकडच्या काळात येथे मद्यपान, ड्रग्ज् आदी गोष्टींनी मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. त्यामुळे पर्यटन बदनाम होत आहे. त्याला वेळीच आवर घालण्यासाठी ‘संकल्प नशामुक्ती’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. - सत्य साई कार्तिक, उप विभागीय पोलिस अधिकारी, लोणावळा