तरुणांना बेकायदेशीर शस्त्र बाळगणे भोवले; पिस्तूलासह चार काडतुसे जप्त, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 10:51 AM2021-06-21T10:51:29+5:302021-06-21T10:51:40+5:30
भोसरी पोलिसांची कारवाई, एक पिस्तूल, चार काडतुसे तसेच एक मॅक्झिन असा ३४ हजार रुपये किमतीचा माल जप्त
पिंपरी: विक्रीसाठी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३४ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल, चार काडतुसे तसेच एक मॅक्झिन जप्त करण्यात आले. भोसरी येथील गाव जत्रा मैदान येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली.
योगेश शिवाजी दाभाडे (वय २२), निलेश पुंडलिक चव्हाण (वय २१), जगदीश बाळू शेळके (वय २१, तिघेही रा. भोसरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी सागर भोसले यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन तरुण हे विक्रीसाठी बेकायदेशीर शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी कारवाई करून त्यांना पकडले. त्यांच्याकडून एक पिस्तूल, चार काडतुसे तसेच एक मॅक्झिन असा ३४ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आहे. १५ ते २८ जून या कालावधीसाठी पोलीस आयुक्तांनी याबाबतचा आदेश दिला आहे. तिघांनी या आदेशाचा भंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.