चिंचवडमधील 'त्या' अपहरण झालेल्या तरुणीचा न्यायालयात अचानक 'यू टर्न; म्हणाली....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 01:08 PM2021-01-22T13:08:23+5:302021-01-22T13:08:52+5:30
आरोपीने तरुणीचे ऑफिस गाठत भरदिवसा तिच्या पोटाला पिस्तुल लावत अपहरण केल्याची घटना घडली होती.
पिंपरी : चिंचवडमधून एका तेवीस वर्षीय युवतीचे मंगळवारी (दि. १९) सकाळी अकराच्या सुमारास अपहरण करण्यात आले. उच्चशिक्षित व इंटेरियर डिझायनर असलेली ही तरुणी नेहमीप्रमाणे कामावर आली होती. पण आरोपी शंतनूने थेट तिचे ऑफिस गाठत भरदिवसा तिच्या पोटाला पिस्तुल लावत अपहरण केले. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणाला आता नाट्यमयरित्या वळण मिळाले आहे.
शंतनू चिंचवडे (रा. चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी (दि. १९) सकाळी अकराच्या सुमारास तरुणी काम करीत असलेल्या ठिकाणी शंतनू गेला. पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण केले, असा गुन्हा शंतनूवर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शंतनूला पोलिसांनी अटक केली. आमच्या दोघांचे प्रेमसंबंध आहेत. त्या तरुणीने माझ्याशी अबोला धरल्यामुळे मी तिच्या कार्यालयात गेलो. माझ्याकडे पिस्तूल नव्हे तर ते लायटर होते, असा कबुली जबाब शंतनू याने पोलिसांना दिला होता. त्यानंतर न्यायालयाने शंतनू याला एक दिवसांची पोलीस कोठडी दिली.
दरम्यान गुरुवारी (दि. २१) पुन्हा शंतनू याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पीडित तरुणीही न्यायालयात हजर होती. शंतनूवर दाखल करण्यात आलेला अपहरणाचा गुन्हा खोटा आहे, असे प्रतिज्ञापत्र तिने न्यायालयात दिले. शंतनूसोबत आपण स्वतः गेलो, असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमयरित्या वळण मिळाले आहे, असे अॅड. अतिश लांडगे यांनी सांगितले.