पोलिसांकडे मदतीसाठी आलेल्या तरुणीलाच मागितले दहा हजार, नैराश्यात जाऊन तिने संपवलं स्वतःचे जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:39 PM2021-05-07T12:39:35+5:302021-05-07T12:40:04+5:30
लग्न करण्यासाठी तरुण मागत होता भरमसाठ पैसे
पिंपरी: रहाटणी येथील रहिवासी तरुणी श्रद्धा कोकणे हीने पोलिसांकडे मदतीची याचना केली. पण पोलिसही तिच्या मदतीला धावून आले नाहीत. शेवटी त्रास असह्य झाल्याने तिने आत्महत्या केली. तरुण आणि त्याचं कुटुंबिय श्रद्धाला ब्लॅकमेल करत होतं. याची तक्रार तिने वाकड पोलिसांकडे केली. पण पोलिसांकडूनच तिला दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यानं तिचा केवळ तक्रार अर्जच दाखल करण्यात आला. त्यामुळे नैराश्यात श्रद्धाने आत्महत्या केली असल्याचा आरोप तिचा भाऊ ऋतिक कोकणे याने केला आहे. २६ एप्रिलला रहाटणी इथे ही घटना घडली.
श्रद्धा कोकणे (वय २४) हिचं लग्न नात्यातीलच अजिंक्य साठे या मुलाशी ठरलं होतं. मात्र नंतर साठे कुटुंबियांकडून भरमसाठ पैशांची मागणी आणि त्यातच अजिंक्य याचे इतर मुलींशी संबंध या त्रासाला कंटाळून श्रध्दाने हे लग्न न करण्याचा निर्णय घेतला. पण साठे कुटुंबियांकडून वारंवार लग्नासाठी दबाव टाकला जात होता. लग्न न केल्यास माझ्यासोबतचे तुझे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी अजिंक्य श्रध्दाला देत होता. त्यामुळे श्रद्धा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वाकड पोलीस स्टेशनला गेली होती. पण तिथेही तिची निराशा झाली. गुन्हा दाखल करून घेण्यासाठी तिथल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने तिच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने पोलिसांनी केवळ अर्जच दाखल करून घेतला.
त्यानंतर पोलिसांनी 'मी व माझे कुटुंबीय श्रद्धाला त्रास देणार नाही, तिचे फोटो व व्हिडीओ डिलीट केले आहेत,' असा मजकूर टाइप केलेल्या कागदावर अजिंक्यची सही घेतली. या औपचारिकतेनंतरही अजिंक्यकडून श्रद्धाला सोशल मीडियावर त्रास देणे सुरूच राहिले. हा त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर श्रध्दाने २६ एप्रिलला राहत्या घरी आत्महत्या केली.
अजिंक्यचे राजकीय कार्यकर्ता असलेल्या दाजीकडूनही पोलिसांवर दबाव आणला गेला होता, असा आरोप श्रद्धाच्या भावाने केला आहे. श्रद्धाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्यूला अजिंक्य, त्याचे आईवडील, दोन बहिणी आणि दाजी जबाबदार असल्याचा मॅसेज तिने आपल्या मोबाईलवर टाइप करून ठेवला होता. पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पैकी दोन बहिणी आणि दाजी यांना जमीन मिळाला आहे. तर अजिंक्यच्या आई वडिलांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. तसेच वाकड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सपना देवताळे यांना पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे.