"तुमच्या घराचा कर भर अन्यथा कारवाई होईल", पिंपरीत वृद्धाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 07:28 PM2023-01-04T19:28:43+5:302023-01-04T19:28:49+5:30
वृद्धाचा विश्वास संपादन करून २५ हजारांची सोन्याची वेढणी आणि ५०० रुपयांचा मोबाईल काढून घेतला
पिंपरी : मी महापालिकेत काम करतो. तुमच्या घराचा कर थकला आहे, असे पादचारी वृद्धाला सांगितले. त्यानंतर वृद्धाची सोन्याची अंगठी आणि मोबाईल घेऊन अनोळखी व्यक्ती पळून गेला. पवारवस्ती, चिखली येथे सोमवारी (दि. २) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
अविनाश मनोहर पवार (वय ७५, रा. निगडी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. ३) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका अनोळखी व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून एक अनोळखी इसम फिर्यादीजवळ आला. मी महापालिकेत काम करतो. तुमच्या घराचा कर बाकी आहे. तो भरा नाही तर तुमच्यावर कारवाई होईल, अशी बतावणी करून आरोपीने फिर्यादीला कर भरण्यास सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांच्याकडून विश्वासाने २५ हजारांची सोन्याची वेढणी आणि ५०० रुपयांचा मोबाईल फोन घेतला आणि आरोपी फसवणूक करून पळून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.