"तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे..." तरुणीने अवघ्या चार तासात गमावले ३७ लाख रुपये
By रोशन मोरे | Published: August 10, 2023 06:15 PM2023-08-10T18:15:34+5:302023-08-10T18:18:04+5:30
मोबाईलधारकासह स्काईप आयडीवरून संपर्क साधणाऱ्यावर गुन्हा दाखल...
पिंपरी : हॅलो मी पोलिस ठाण्यातून बोलतोय...तुमच्या नावाचे पार्सल आले आहे. त्यामध्ये ड्रग्ज असून ते पार्सल कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे. तुम्हाला यातून सोडवतो असे म्हणून तरुणीकडून तब्बल ३६ लाख ९९ हजार ९९९ रुपये ट्रान्सफर करून घेतले. ही घटना मंगळवारी (दि.८) सकाळी सव्वानऊ ते दुपारी एक या चार तासांच्या कालावधीत बाणेर येथे घडली. या प्रकरणी तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फोन करणाऱ्या मोबाईलधारकासह स्काईप आयडीवरून संपर्क साधणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला एका अनओळखी क्रमांकवरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने तो पोलिस ठाण्यातून पोलिस असल्याचे सांगत फिर्यादीच्या नावे पार्सल आले आहे. त्या पार्सलमध्ये
बेकायदेशीर पासपोर्ट, लॅपटॉप, ८०० ग्रॅम गांजा,१४० ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज आहे. हे पार्सल कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे. यातून सुटण्यासाठी पैसे पाठवण्यास सांगितले. फिर्यादीने घाबरून आरोपीने दिलेल्या बँक खात्यावर तब्बल ३६ लाख ९९ हजार ९९९ रुपये पाठवले.
मानसिक अस्थिरतीचे घेतला फायदा
पोलिसांनी तरुणीच्या आई-वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, त्यांची मुलगी ही मानसिकदृष्टा अस्थिर आहे. मागील दोन वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती आयटी कंपनीत काम करत असून ती पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणार होती. त्यामुळे तिच्या खात्यावर येवढे पैसे होते. जेव्हा तिला फोन आला तेव्हा तीने घाबरून पैसे पाठवून दिले.