विक्रीसाठी १५ लाखांचे मांडूळ बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 10:52 AM2021-06-23T10:52:09+5:302021-06-23T10:52:22+5:30
इंद्रायणीनगर भोसरी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी: विक्रीसाठी मांडूळ बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. इंद्रायणीनगर भोसरी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
योगेश मारेआप्प म्हेत्रे (वय २१, रा. आनंद नगर, चिंचवड), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. वनविभागाचे वनरक्षक असलेले सुरेश काशिनाथ बरले (वय ३०, रा. भांबुर्डा, गोखले नगर, पुणे) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मांडूळ जातीचा सरपटणारा प्राणी विनापरवाना विक्रीसाठी स्वतःजवळ बाळगला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करून त्याला पकडले. त्याच्याकडे १५ लाख रुपये किंमतीचे मांडूळ मिळून आले.