देहूरोडमध्ये तरुणावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:36 AM2018-08-27T01:36:01+5:302018-08-27T01:36:04+5:30
गांधीनगर येथील एकाच्या मागे आरोपी पळत असताना धक्का लागल्याने संबंधित इसम पळून गेल्याचा राग मनात धरून एका युवकाच्या डोक्यात
देहूरोड : गांधीनगर येथील एकाच्या मागे आरोपी पळत असताना धक्का लागल्याने संबंधित इसम पळून गेल्याचा राग मनात धरून एका युवकाच्या डोक्यात व हातावर वार करून तिघेजण पळून गेल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
सुरेश मुन्ना अवचिते (वय २३, रा गांधीनगर, देहूरोड, पुणे) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. या प्रकरणी सलमान मेहबूब शेख, शाहरुख मेहबूब शेख व नौशाद नजीर शेख (सर्व रा. देहूरोड) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हे शनिवारी संदीप खणसे यांच्या मागे पळत होते. त्या वेळी सुरेश अवचिते यांचा खणसे यांना धक्का लागला. त्यामुळे ते सुरेशमुळेच पळून गेले याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी सुरेश यांच्यावर वार केले.
विदेशी दारुच्या बाटल्या जप्त
तळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन भागातील तीन बीअर शॉपींवर धाड टाकत बेकायदा पद्धतीने विकल्या जाणाऱ्या १६ हजार ५०० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. वाघमोडे हे वाहतूक समस्येवर फिरून प्रत्यक्ष पाहणी करत असता ठिकठिकाणी बीअर शॉपीवर खुलेआम दारुविक्री होत असल्याची माहिती पुढे आली .याची गंभीर दखल घेत वाघमोडे यांनी तळेगाव स्टेशन भागातील गोल्डन बीअर शॉपी, गाव भागातील आकाश बीअर शॉपी आणि किनारा बीअर शॉपीवर धाड टाकली. यापुढेही अवैध धंद्यावर कडक कारवाई सुरू ठेवणार असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले. पोलीस नाईक योगेश आढारी, प्रशांत वाबळे, विश्वास पाटील, विठ्ठल वडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.