पिंपरीत खळबळ! इंग्लंडहून दहा दिवसांपूर्वी आलेला युवक कोरोना पाॅझिटीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 11:01 PM2020-12-26T23:01:29+5:302020-12-26T23:01:56+5:30
Corona Positive from England: इंग्लंडमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. कोरोना विषाणुच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्टेन आढळला आहे. त्याचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
पिंपरी: इंग्लंडहुन दहा दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या एका ३५ वर्षीय युवकाचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर नवीन भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. ७० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, पॉझिटिव्ह सापडलेल्या प्रवाशांस झालेला कोरोना नवीन की जुना हे शोधण्यासाठी त्याच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीला पाठवले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
इंग्लंडमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. कोरोना विषाणुच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्टेन आढळला आहे. त्याचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आदेशानुसार २४ नोव्हेंबरनंतर इंग्लंडहून शहरात आलेल्या व्यक्तींचा शोध महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. पथकाने पाहणी केल्यानंतर ३५ वर्षीय युवकात कोरोनाची लक्षणे आढळली. त्याच्या घशातील व नाकातील द्रावाचे नमुने तपासले. त्याचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर नवीन भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्ह सापडलेल्या प्रवाशांस झालेला कोरोना नवीन की जुना हे शोधण्यासाठी त्याच्या घशातील द्रवाचे नमुने एनआय व्हीला पाठवले आहेत, असे वैदकीय अधिकारी यांनी सांगितले.
युके येथून एकुण ११५ प्रवासी होते. सर्वांचा शोध घेतला आहे. त्यापैकी १५ प्रवासी पिंपरी-चिंचवड शहारा बाहेर निघून गेले आहेत. १५ प्रवाशांचे पत्ते अपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापर्यंत अजून प्रशासन पोहोचले नाही.
शहरात आलेल्या ८५ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केली आहे. त्यापैकी ७० जणांचे अहवाल निगेटिव्ह असून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. उर्वरित १५ अहवाल अजून येणे बाकी आहे.