वर्षाविहारासाठी आलेल्या तरुणाचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 04:48 PM2019-07-02T16:48:01+5:302019-07-02T16:50:03+5:30
कासारसाई धरण परिसरात युवकमित्र फिरण्यासाठी आले होते.
तळेगाव दाभाडे : मित्रांसोबत वर्षाविहारासाठी आलेल्या एका तरुणाचा कुसगाव हद्दीत कासारसाई धरणात बुडून मृत्यू झाला.ही दुर्घटना रविवार (दि.३०) सायंकाळी ६.३०च्या सुमारास घडली. अभिषेक गोपालप्रसाद गुप्ता (वय २४, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी, पुणे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
या संदर्भात,गणेशकुमार चंद्रमोहन झा (वय २३, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी पुणे) यांनी शिरगाव पोलीस चौकीत माहिती दिली आहे.पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी
सुट्टी असल्याने गणेशकुमार झा, अभिषेक गुप्ता, अभिषेक विश्वकर्मा, निलेश जीवने, कोमल देहनकर, शेपाली पारधी आदी
कासारसाई धरण परिसरात युवकमित्र फिरण्यासाठी आले होते. त्यातील अभिषेक गुप्ता व अभिषेक विश्वकर्मा पोहण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उतरले. मात्र पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने अभिषेक गुप्ता यांचा दमछाक झाला.मित्रांनी गुप्ता याला वाचविण्याच्या प्रयत्न केला.मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. सुदुंबरे येथील एनडीआरएफ बटालियनला पाचारण करण्यात आले. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास एनडीआरएफच्या पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.तळेगाव प्राथमिकआरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या
ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार उमेश गोरे करत आहे.