पदवीपेक्षा कौशल्यविकासाला तरुणांनी दिले महत्त्व
By admin | Published: September 7, 2015 04:26 AM2015-09-07T04:26:10+5:302015-09-07T04:26:10+5:30
महाविद्यालयात प्रवेश घेतला, अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी प्रमाणपत्र मिळाले, त्यानंतर कोठे तरी नोकरी मिळवायची, एवढाच उद्देश न ठेवता शिक्षण घेतो
संजय माने, पिंपरी
महाविद्यालयात प्रवेश घेतला, अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी प्रमाणपत्र मिळाले, त्यानंतर कोठे तरी नोकरी मिळवायची, एवढाच उद्देश न ठेवता शिक्षण घेतो, ते परिपूर्ण कौशल्याचे असावे, असे ध्येय निश्चित करून कौशल्य पणाला लावलेल्या पिंपरी-चिंचवडमधील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांनी स्पर्धेसाठी मोटार तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सलग दोन वर्षे यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा हा यंदाचा तिसरा प्रकल्प आहे.
सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसएइ) या संस्थेच्या पुढाकाराने दर वर्षी इंदोर येथील पितांपूरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात येते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारे विद्यार्थी देशभरातून या स्पर्धेत सहभागी होतात. त्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण करतात. सुमारे ४०० प्रकल्पांतून १२० प्रकल्पांची निवड केली जाते. त्यात सलग दोन वर्षे निवड झालेल्या आणि यशस्वी कामगिरी केलेल्या हिंजवडीतील अलार्ड इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या वर्षी स्पर्धेत उतरण्याची जय्यत तयारी केली आहे. चुरस, स्पर्धा, यश, पारितोषिक हे टप्पे महत्त्वाचे मानले गेले, तरी त्या पलीकेडे ज्ञान मिळवितो, ते कौशल्यपूर्ण असावे, हा उद्देश बाळगलेले विद्यार्थी अभ्यासाबरोबर कौशल्यगुण विकासाला अधिक महत्त्व देत आहेत.
काळेवाडीतील एका सोसायटीत त्यांचे मोटार जोडणीचे काम सुरू आहे. काळेवाडीतील एका गृहसंस्थेत यातील काही विद्यार्थी सदनिका भाड्याने घेऊन राहतात. त्या ठिकाणी ते प्रकल्पाचे काम करीत आहेत. वर्क्सशॉपमध्ये जाऊन वेल्डिंग, ग्राइंडिंगची कामे करून घेतली जातात. मोटारीचे आवश्यक ते सर्व सुटे भाग हे विद्यार्थी स्वत:च तयार करतात. २३ जणांचा गट या प्रकल्पासाठी राबतो आहे. प्रकल्पाचा उपकप्तान असलेला प्रदीप अकोलकर म्हणाला, ‘‘वेगवेगळ्या भागांतून पुण्यात शिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी आलेले विद्यार्थी केवळ पदवी घेऊन बसणार असतील, तर उपयोग काय? जे शिकतो आहे, ते अगदी मनापासून करायचे.’’