Pimpri Chinchwad: ‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणाची उकल; ट्रेलर चोरून नेताना मारहाण केल्याने मृत्यू

By नारायण बडगुजर | Published: December 2, 2023 06:05 PM2023-12-02T18:05:41+5:302023-12-02T18:06:35+5:30

याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने ४८ तासांत तीन जणांना अटक केली...

Youth Murder Case Solved; Death due to beating while stealing trailer | Pimpri Chinchwad: ‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणाची उकल; ट्रेलर चोरून नेताना मारहाण केल्याने मृत्यू

Pimpri Chinchwad: ‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणाची उकल; ट्रेलर चोरून नेताना मारहाण केल्याने मृत्यू

पिंपरी : ट्रेलर चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे काढून मोकळ्या जागेत मृतदेह फेकून दिला. खेड तालुक्यातील निघोजे गावच्या हद्दीत बुधवारी (दि. २९) हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने ४८ तासांत तीन जणांना अटक केली.

अमोल विकास पवार (रा. नांदुरगा तांडा, ता. औसा, जि. लातूर), असे खून झालेल्याचे नाव आहे. दशरथ उर्फ सोनू जयराम आडसूळ (२१), बळीराम वसंत जमदाडे (३५, दोघेही रा. कामठा, ता. जुळजापूर, जि. धाराशीव), विष्णू अंगद राऊत (२९, रा. नालवंडी, जि. बीड) अशी अटक  केलेल्यांची नावे आहेत.  

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे येथे महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीमागे मोकळ्या जागेत एक विवस्त्र मृतदेह आढळून आला. खून प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा गुंडा विरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला. मयताची ओळख पटत नव्हती. त्याच्या हातावरील बंजारा असे गोंदण होते.  

मयत अमोल पवार याचा साथीदार चालक रोहिदास राजेंद्र चव्हाण (३०, रा. होळी, ता. लोहारा, जि. धाराशीव) याच्याकडे केलेल्या तपासावरून मयताचे नाव अमोल पवार असल्याचे समजले. त्यानंतर निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर येथून ते गुन्ह्याच्या घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मयत अमोल हा चिंचवड येथे केएसबी चौकात एका ट्रेलरमध्ये चढताना दिसून आला. त्या ट्रेलरच्या नंबरवरून माहिती घेतली असता ट्रेलर हा भारव्दाज ट्रेलर सर्व्हीसेस यांचा असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे तपास करता संबंधित ट्रेलरवरील चालक विष्णू राऊत, दुसऱ्या ट्रेलरवरील चालक दशरथ आडसूळ व त्यांचा मित्र बलराम जमदाडे हे ट्रेलर पार्क करून जेवणासाठी गेले. त्यावेळी अमोल त्यांचा ट्रेलर चोरी करून घेऊन जात होता. त्यामुळे त्यांनी अमोल याला पकडले व त्याच ट्रेलरमध्ये घालून जबर मारहाण करून त्यास महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या जवळ मोकळ्या जागेत नेऊन टाकून दिले. 

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त सतीश माने, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने पोलिस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकिर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, विजय गंभिरे, सुनील चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, शुभम कदम, तौसीफ शेख व टीएडब्ल्युचे नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.  

‘जीपीएस’व्दारे मिळाले ‘लोकेशन’

चालक विष्णू राऊत व सोनू आडसुळ हे आपआपले ट्रेलर घेऊन मुंबईच्या दिशेने गेल्याचे समजले. दोन्ही ट्रेलरची जीपीएसव्दारे माहिती घेतली असता एक ट्रेलर हा रायगड जिल्ह्यातील कळंबोली येथे व दुसरा ट्रेलर हा पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे असल्याचे समजले. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाच्या दोन स्वतंत्र टिम रवाना झाल्या. दशरथ आडसूळ यास कळंबोली येथून व विष्णू राऊत यास बोईसर येथून ताब्यात घेतले. बळीराम जमदाडे याला देहूगाव येथील विठ्ठलवाडी येथून ताब्यात घेतले. 

Web Title: Youth Murder Case Solved; Death due to beating while stealing trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.