किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून; भरदिवसा घडलेल्या घटनेने तळेगाव परिसरात खळबळ
By प्रकाश गायकर | Updated: January 31, 2025 19:48 IST2025-01-31T19:47:53+5:302025-01-31T19:48:17+5:30
किरकोळ वादाचा राग मनात धरून शस्त्राने तरुणाच्या चेहरा व डोक्यावे वार केले, या घटनेत गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला

किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून; भरदिवसा घडलेल्या घटनेने तळेगाव परिसरात खळबळ
पिंपरी : तळेगाव येथील सरस्वती विद्यालयासमोर किरकोळ वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. आर्यन शंकर बेडेकर (वय १९, रा. सिद्धार्थनगर, तळेगाव स्टेशन) असे यामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ३१) दुपारी तळेगाव येथील सरस्वती विद्यालयासमोर घडली. मयत आर्यन बेडेकर याच्यावर त्याच्याच ओळखीचे शिवराज कोळी, संतोष कोळी, आशिष लोखंडे आणि पोळ्या लोखंडे यांनी हल्ला केला. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे तळेगाव परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन आणि संशयित यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून संशयितांनी आर्यनवर कोयता व धारदार शस्त्राने वार केले. त्यामध्ये त्याचा चेहरा व डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर संशयित पळून गेले. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.