तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे : संकल्प गोळे; नववर्षाचे पिंपरीत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:54 PM2018-01-02T12:54:11+5:302018-01-02T12:58:37+5:30
तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित एकवीरा पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक संकल्प गोळे यांनी केले.
रावेत : सध्या तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाकडे वळली आहे. व्यसनामुळे स्वत:बरोबर कुटुंबाचे नुकसान होत आहे. त्यामुळे तरुणांनी व्यसनापासून दूर राहून समाजाला वेगळेपण देण्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित एकवीरा पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक संकल्प गोळे यांनी केले.
वाल्हेकरवाडी येथील एकवीरा सेवा संघ ट्रस्ट, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने नववर्ष स्वागतासाठी आयोजित वाल्हेकरवाडी ते कार्ला एकवीरा देवी पालखी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी केले.
या वेळी पालखीचे पूजन नगरसेविका करुणा चिंचवडे, संगीता भोंडवे, सुरेश भोईर, सचिन चिंचवडे, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर चिंचवडे, नीलेश मरळ, कोंडिबा शिवले, खंडू चिंचवडे, सोमनाथ भोंडवे, लाला वाल्हेकर, सोपान वाल्हेकर, मदन कोकणे, रमाकांत कोकणे, अॅड. अरुण भराडे, हेमंत ननावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पालखी सोहळा यशस्वीतेसाठी बाबा गाडगे, शिवाजी आवारे, विनोद राठीड, बिरुमल चोबे, विशाल मोहिते, गणेश गिरी, महेश ढाकोळ, राजू सोनार, संतोष सोरटे, उत्तरेश्वर शिंदे, संतोष पवार, हर्षवर्धन कुºहाडे, संतोष तिकोणे आदींनी परिश्रम घेतले. अध्यक्ष सुधीर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले.
तीनशे तरुणांचा पालखी सोहळ्यात सहभाग
वाल्हेकरवाडीतील एकवीरा सेवा संघाच्या वतीने सरत्या वर्षाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप देण्याकरिता प्रत्येक वर्षी संस्थापक अध्यक्ष सुधीर ऊर्फ आबा वाल्हेकर आणि महिला प्रदेशाध्यक्षा पल्लवी वाल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पायी वाल्हेकरवाडी ते कार्ला देवीपर्यंत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक वर्षी या सोहळ्यात तरुणांचा सहभाग वाढत चालला आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी काही जण पहाटेपर्यंत हॉटेलमध्ये आनंद लुटतात.
काही जण गाण्याच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत चित्र-विचित्र अंगविक्षेप करताना नाचतात. काही जण घरातच टीव्हीवरील कार्यक्रम पाहून समाधान मानतात. काही जण सहलीला जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. या सर्वांना फाटा देऊन महिला, तरुण, लहान मुलगे, ज्येष्ठ नागरिक आदी जवळपास ३०० लोकांनी या पालखी सोहळ्यात सहभागी होत व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प केला.