सोशल मीडियाद्वारे भाईगिरी, शहरातील तरुण धोक्याच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:52 AM2018-07-13T01:52:27+5:302018-07-13T01:52:37+5:30
हातात तलवार, कोयता, पिस्तूल अशी शस्त्र घेऊन भाईगिरी लूक दिसून येईल, अशी स्टायलिस्ट काढलेली छायाचित्र फेसबुक, व्हॉटसअॅप ग्रुपवर शेअर करायची, त्याखाली चित्रपटातील एखादा डायलॉग टाकायचा अगदी मिसरूड न फुटलेली मुलेही स्वत:ला भाई समजू लागली असून, सोशल मीडियावर त्यांच्या भाईगिरीची क्रेझ वाढली आहे.
मोशी - हातात तलवार, कोयता, पिस्तूल अशी शस्त्र घेऊन भाईगिरी लूक दिसून येईल, अशी स्टायलिस्ट काढलेली छायाचित्र फेसबुक, व्हॉटसअॅप ग्रुपवर शेअर करायची, त्याखाली चित्रपटातील एखादा डायलॉग टाकायचा अगदी मिसरूड न फुटलेली मुलेही स्वत:ला भाई समजू लागली असून, सोशल मीडियावर त्यांच्या भाईगिरीची क्रेझ वाढली आहे.
पिंपरी, चिंचवड, भोसरी, इंद्रायणीनगर, मोशी, चºहोली, चिखली, भोसरी, कासारवाडी अशा भागांत तरुणाईच्या उंबरठ्यावरील मुलांच्या भाईगिरीचे दर्शन सोशल मीडियावर घडत आहे. अलीकडच्या काळात ‘आऊट डोअर’ फोटोग्राफीचा नवा ट्रेंड बाजारात सुरू झाला आहे. तरुणाईच्या उंबरठ्यावरील मुले गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी फेसबुकवर आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. हातात कोयता, तलवार, बनावट पिस्तूल घेऊन ग्रुपची काढलेली छायाचित्र सोशल मीडियावर पाठवून ते एक प्रकारे त्यांनी तयार केलेल्या ग्रुपचे ब्रँडिंग करत आहेत. सोशल मीडियावर सुरू असतो लाईक, कमेंटचा खेळ...ज्याला जितक्या जास्त लाईक अन् कमेन्ट तितकी त्याची दहशत अधिक असा त्यासाठी त्यांच्याकडूनच तर्क काढला जातो. सोशल मीडियाच्या लाईक, कमेन्टसच्या या खेळातून त्यांच्यातील वर्चस्ववादाच्या स्पर्धेला सुरुवात होते. एकमेकाला आव्हान, प्रतिआव्हान दिले जाते.
हातात आलेले स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाचा अतिरेकी वापर यामुळे तरुणाई धोक्याच्या उंबरठ्यावर असून, वेळीच उपाययोजना केल्या तर तरुणाईपुढील धोका टळू शकेल, असे नागरिकांचे मत आहे.
भय : दहशतीसाठी होतेय वाहनांची तोडफोड
फेसबुकवर ग्रुपचे अस्तित्व दाखवून दिल्यानंतर एखाद दुसऱ्या शुल्लक कारणावरून ते शाळा, महाविद्यालयाच्या आवारातच राडा करून त्यांची भाईगिरी प्रत्यक्ष कृतीत आणतात. पुढच्या टप्प्यावर शाळा, महाविद्यालयात दादागिरी करून ते स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे, आपली दहशत पसरविणे हा त्यामागे उद्देश असतो. पुढील टप्प्यात मित्रमंडळींना बरोबर घेऊन रात्री अपरात्री भर रस्त्यात केक कापून ते वाढदिवस साजरा करतात. त्यानंतरच्या टप्प्यात राहात असलेल्या परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड अशा गंभीर आणि समाज स्वास्थ्य बिघडविणाºया कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असतो.