गेम वाजवायची म्हणून पिस्तूल खरेदीसाठी फोडले एटीएम; पिंपरीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 10:07 PM2021-08-17T22:07:31+5:302021-08-17T22:07:54+5:30

चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Youth was arrested from Atm broke case in pimpri | गेम वाजवायची म्हणून पिस्तूल खरेदीसाठी फोडले एटीएम; पिंपरीतील घटना

गेम वाजवायची म्हणून पिस्तूल खरेदीसाठी फोडले एटीएम; पिंपरीतील घटना

Next

पिंपरी : आपल्याला मारहाण करणाऱ्या तरुणाचा गेम वाजवण्यासाठी पिस्तूल खरेदी करायचे म्हणून एका तरुणाने चक्क एटीएम फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा दरोडा विरोधी पथकाने आरोपी तरुणाला अटक केली. 

विशाल दत्तू कांबळे (वय २४, रा. संगमनगर, रेल्वे लेन, जुनी सांगवी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १६) रात्री एकच्या सुमारास एका चोरट्याने जुनी सांगवी येथील ॲक्सीस बँकेचे एटीएमची तोडफोड करून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दरोडा विरोधी पथकाने परिसरातील ८० ते ९० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. एटीएममधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीने घातलेला शर्ट आणि सॅंडलवरून पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी संगमनगर, जुनी सांगवी या परिसरातील असावा, अशी माहिती मिळाली. पोलीस नाईक राजेश कौशल्ये यांना सोमवारी रात्री साडेआठला संशयित तरुण निदर्शनास आला. त्याच्या नकळत पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. एका हॉटेल जवळ तो थांबला असता त्यास पोलीस नाईक कौशल्ये यांनी दारू कोठे मिळेल, असे विचारले. त्याने जवळच्या परिसरात दारू मिळेल, असे सांगितले. तेव्हा त्यास दारू पिण्यास सोबत जाऊ, असे म्हणून विश्वासात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. 
मागील आठवड्यामध्ये सांगवी परिसरामध्ये ऐकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून त्याला एका मुलाने मारहाण केली होती. त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता. त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने मारहाण केलेल्या मुलाचा गेम वाजविण्यासाठी पिस्तुलची आवश्यकता होती. पिस्तुल आणण्यासाठी एटीएम फोडून पैसे मिळतील व त्या पैशातून पिस्तुल खरेदी करून मारहाण करणाऱ्या मुलाला काही अंतरावरून गोळी मारायची होती, असा त्याने प्लॅन केला होता. म्हणून त्याने एटीएम फोडले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस कर्मचारी राजेश कौशल्ये, उमेश पुलगम, सागर शेडगे, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, प्रवीण कांबळे, प्रवीण माने, आशिष बनकर, नितीन लोखंडे, गणेश कोकणे, चिंतामण सुपे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Youth was arrested from Atm broke case in pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.