रेल्वेत मिळणार स्वादिष्ट पुरणपोळी; प्रवाशांना आवडीनुसारही खाद्यपदार्थ पुरविण्याची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 04:46 PM2022-11-27T16:46:34+5:302022-11-27T16:46:43+5:30
आयआरसीटीसीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या भोजनात ऋतूनुसार तसेच त्या त्या प्रदेशांचे वैशिष्ट्य असणाऱ्या अन्नपदार्थांना प्राधान्य देण्यात येणार
पिंपरी : रेल्वेने लांबचा प्रवास करायचा म्हटले की अनेकांना जेवणाचा डबा सोबत घ्यावा लागतो. मात्र, प्रवास दोन-तीन दिवसांचा असेल तर खाण्याचे हाल होणार हे अनेक जण गृहीत धरतात. त्यात रेल्वेमध्ये मिळणारे व्हेज-नॉनव्हेज जेवण आणि त्याच त्याच भाज्या अनेकांना नको होतात. रेल्वेने प्रवास करताना यापूर्वी आयआरसीटीसीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या भोजनात मोजक्या पदार्थांचा समावेश होता. आता प्रवाशांना त्यांच्या प्रादेशिक आवडीनुसार खाद्यपदार्थ पुरविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अगदी आपल्या आवडीच्या पुरणपोळीवरदेखील रेल्वे प्रवासात ताव मारता येणार आहे.
सणासुदीनुसार मिळतील खाद्यपदार्थ
आयआरसीटीसीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या भोजनात ऋतूनुसार तसेच त्या त्या प्रदेशांचे वैशिष्ट्य असणाऱ्या अन्नपदार्थांना प्राधान्य देण्यात येणार आहेत. विशेष काही पदार्थ हे विशिष्ट सणासुदीलाच बनवले जातात. जसे की पुरणपोळी. मात्र, सणासुदीला बनवण्यात येणारे हे अन्नपदार्थसुद्धा आयआरसीटीसीतर्फे पुरवण्यात येणार आहेत.
तुम्ही मागवा तुमच्या आवडीचा पदार्थ
प्रदेशानुसार प्रत्येकाची खाद्यपदार्थांची आवड वेगळी वेगळी असते. काहींना काळ्या मसाल्यातील भाजी आवडते, तर काहींना खान्देशी पद्धतीचे वांग. मात्र, यापूर्वी रेल्वे प्रवास करताना आवडीचे पदार्थ आयआरसीटीसीच्या मेनूमध्ये नव्हते. मात्र, आता ही अडचण दूर झाल्याने प्रवाशांना आपल्या आवडीचे पदार्थ प्रवासात खाता येणार आहेत.
मागविलेल्या पदार्थांचे दर निश्चित
नव्या योजनेची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. दरम्यान, पूर्वी शुल्कामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रमाणित जेवण थाळीसारख्या मर्यादित खर्चाच्या पदार्थांची निवड आयआरसीटीसीद्वारे करण्यात येणार आहे. जनता गाड्यांमधील जेवणाची यादी आणि किमती यांच्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच स्वतंत्रपणे मागविल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांसाठीच्या किमती आयआरसीटीसीतर्फे निश्चित केल्या जाणार आहेत.
''पूर्वी प्रवासात यादीत निश्चित केलेलेच पदार्थ मिळत होते. मात्र, आता या यादीमध्ये प्रादेशिक पदार्थांची भर पडणार आहे. शिवाय याचे दरदेखील प्रवाशांना परवडतील असेच असणार आहेत. त्यामुळे ही नवी योजना प्रवाशांच्या फायद्याचीच ठरेल. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे''