पुण्यात आला ‘झिका’; पिंपरी चिंचवडकरांनो, तब्येत सांभाळा! पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:41 PM2024-07-03T12:41:17+5:302024-07-03T12:42:08+5:30

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार आहे. डोकेदुखी, स्नायूंचा त्रास, शरीरावर बारीक पुरळ, लाल चट्टे उठणे, ताप ही या झिका आजाराची लक्षणे आहेत...

'Zika' came to Pune; Pimpri Chinchwadkars, take care of your health! A call to care for the municipality | पुण्यात आला ‘झिका’; पिंपरी चिंचवडकरांनो, तब्येत सांभाळा! पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन

पुण्यात आला ‘झिका’; पिंपरी चिंचवडकरांनो, तब्येत सांभाळा! पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन

पिंपरी : पावसाळ्याच्या तोंडावर पुण्यात झिका आजाराचा शिरकाव झाला आहे. पुण्यातील एका ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या १३ वर्षीय मुलीमध्ये झिका आजाराची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनीदेखील खबरदारी घ्यावी तसेच हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने तत्काळ महापालिका रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून केले आहे.

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार आहे. डोकेदुखी, स्नायूंचा त्रास, शरीरावर बारीक पुरळ, लाल चट्टे उठणे, ताप ही या झिका आजाराची लक्षणे आहेत. पुणे शहरात झिका आजाराचा रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत झिका विषाणू रुग्ण आढळू नयेत यासाठी वैद्यकीय विभागाकडून त्या आजाराच्या अनुषंगाने खबरदारी व उपाययोजना करण्यात येत आहेत. झिका आजाराविषयी काही लक्षणे आढळून आल्यास तातडीने महापालिकेच्या रुग्णालय व दवाखान्यात उपचार घ्यावेत, असे आवाहन डाॅ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

झिका आजाराची लक्षणे

१) बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात.

२) यामध्ये ताप, अंगावर रॅश (पुरळ) उमटणे, डोळे येणे, खांदे व स्नायू दुखणे, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो.

३) ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची आणि २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात.

४) झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. तसेच या आजारात मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे.

उपाययोजना –

१) झिका विषाणू पसरवणारा एडिस डास दिवसा चावणारा डास आहे. त्यामुळे दिवसा पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत.

२) आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाका.

३) घरातील फुलदाण्यांतील पाणी दिवसाआड बदला.

४) पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाका.

५) खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवा.

६) आठवड्यातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी करून घासूनपुसून कोरडी करा.

७) झिका विषाणूग्रस्त व्यक्तीसोबत लैंगिक संबंधातून विषाणू पसरू शकतो त्यामुळे याबाबत खबरदारी घ्यावी.

उपचार –

१) झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही.

२) रुग्णांवर लक्षणानुसार उपाय करणे आवश्यक असते.

३) पिंपरी-चिंचवड मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये झिका विषाणूच्या उपचाराकरिता आवश्यक मनुष्यबळ व औषधोपचार उपलब्ध आहेत.

Web Title: 'Zika' came to Pune; Pimpri Chinchwadkars, take care of your health! A call to care for the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.