देहूरोड परिसरात जकात नाके बंद
By admin | Published: July 2, 2017 02:31 AM2017-07-02T02:31:45+5:302017-07-02T02:31:45+5:30
केंद्र सरकारने एक जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी ) लागू करण्याचा निर्णय घेतल्याने संरक्षण विभागाच्या रक्षा संपदा महासंचालनालयाच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूरोड : केंद्र सरकारने एक जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी ) लागू करण्याचा निर्णय घेतल्याने संरक्षण विभागाच्या रक्षा संपदा
महासंचालनालयाच्या कॅन्टोन्मेंट विभागाच्या एका पत्रानुसार शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्री कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने सर्व जकात नाके बंद केले असून, मध्यरात्रीनंतर नाक्यावर होणारी जकात, पारगमन शुल्क व वाहनप्रवेश शुल्क वसुली बंद करण्यात आली आहे. मात्र, शनिवारी दुपारी जकात नाक्यावर पाहणी केली असता जकात नाक्यावर नियुक्त करण्यात आलेले सर्व कर्मचारी त्यांना कॅन्टोन्मेंट कार्यालयाकडून बदलीबाबत कोणताही आदेश प्राप्त न झाल्याने नाक्यावर बसलेले दिसून आले.
संपूर्ण देशात वस्तू व सेवाकर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शनिवारपासून कॅन्टोन्मेन्ट बोर्डाकडून आकारण्यात येणारा जकात कर, पारगमन शुल्क व वाहन प्रवेश शुल्क बंद करण्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाने कार्यवाही केली असून, बोर्डाच्या हद्दीतील पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील निगडी व शेलारवाडी तसेच कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गवरील शितळानगर (मामुर्डी), देहूगाव ते देहूरोड रस्त्यावरील झेंडेमळा तसेच देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ असणारा जकात नाका असे सर्व पाचही जकात नाके बंद करण्यात आले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री जकात नाके बंद करून त्याठिकाणी जकात नाका बंद असल्याबाबत सूचना लावल्या होत्या. शनिवारी सकाळपासून जकात नाक्यांवरील महत्त्वाचे सामान व विविध वस्तू हलविण्याची तयारी सुरू झाल्याचे चित्र दिसून आले. दुपारी निगडी येथील जकात नाक्यावर प्रत्यक्ष पाहणी केली असता नाक्यावर बोर्डाचे जकात विभागातील कर्मचारी कामावर हजर होते. जकात, पारगमन शुल्क व वाहनप्रवेश शुल्क बंद झाल्याची माहिती नसल्याने काही वाहने थांबून कर भरण्यासाठी नाक्यावर येताच बाहेरच बसलेले कर्मचारी आजपासून ‘वसुली’ बंद झाल्याचे सांगत होते.