पिंपरी-चिंचवडमध्ये ४७ लहान मुलांना दिली ZyCov-D लस, कोणालाही त्रास नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:09 PM2021-10-05T19:09:24+5:302021-10-05T20:02:48+5:30
पिंपरी - चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सत्तेचाळीस मुलांवर ही चाचणी पार पडली
पिंपरी: लहान मुलांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. देशभरात लहानग्यांवर कोरोना लसीची चाचणी पार पडत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरातच लहान मुलांच्या लसीकरणाला देखील सुरुवात होण्याची शक्यता आहे. झायकोव्ह-डी (ZyCov d) नावाची ही लस असून अहमदाबादच्या झायडस कॅडीला (zydus cadila) कंपनीने याची निर्मिती केली आहे.
पिंपरी - चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सत्तेचाळीस मुलांवर ही चाचणी पार पडली. यापैकी एकाही मुलाला कोणताही त्रास झालेला नाही, असा दावा हॉस्पिटलने केला आहे. डॉ. डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉ. शलाका आगरखेडकर यांनी सांगितले की, १२ ते १८ या वयोगटातील मुलांना ही लस देण्यात आली आहे. या लसीचे २८ दिवसांच्या अंतराने तीन डोस द्यावे लागतात. मार्चपासून ही लस देणे सुरू केले होते. तर २६ ऑगस्टपर्यंत या ४७ मुलांचे तीनही डोस पूर्ण झाले आहेत.
'मुलांना कोणताही त्रास नाही'-
कोणतीही लस घेतली की मुलांना जो त्रास होतो, तसा कोणताही त्रास ही लस दिल्यावर झालेला नाही. मुलांना लस देण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या. तसेच पालकांची संमती देखील घेण्यात आली होती. ज्या मुलांना ही लस देण्यात आली त्यांना कोरोना झालेला नसावा अशी अट होती. सर्व अटी आणि नियमांचे पालन करून लस देण्यात आली आहे, अशी माहितीही आगरखेडकर यांनी दिली.