Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऐतिहासिक निर्णय घेणार?; विरोधकांना पुन्हा धक्का देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 07:47 AM2021-08-05T07:47:59+5:302021-08-05T07:54:43+5:30
मोदी सरकार पुन्हा एकदा विरोधकांना धक्का देणार का? यंदा ५ ऑगस्टला मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्याची सुरू केलेली परंपरा मोडणार? हे पाहणं गरजेचे आहे.
नवी दिल्ली – आज ५ ऑगस्ट. मागील २ वर्षापासून ५ ऑगस्टच्या दिवशी मोदी सरकार ऐतिहासिक निर्णय घेत आहे. २०१९ मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतला. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या येथे राम मंदिराचं भूमिपूजन केले. त्यामुळे यंदा ५ ऑगस्टला काय होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.
मोदी सरकार पुन्हा एकदा विरोधकांना धक्का देणार का? यंदा ५ ऑगस्टला मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्याची सुरू केलेली परंपरा मोडणार? हे पाहणं गरजेचे आहे. मोदी सरकारसाठी ५ ऑगस्ट हा खास दिवस आहे. ५ ऑगस्ट हा दिवस आहे ज्यादिवशी मोदी सरकार भाजपाच्या अजेंडा पूर्णत्वास नेते. ८ ऑगस्ट २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले होते. तेव्हा मोदी म्हणाले होते की, एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अटलजी आणि कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण झालं आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या युगाला सुरुवात झाली आहे. ही तीच तारीख आहे ज्यादिवशी मोदी सरकारनं संसदेत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला होता.
५ ऑगस्ट ही तीच तारीख आहे ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या स्वप्नाचा पाया रचला. २०२० मध्ये याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन श्री राम मंदिराचं भूमिपूजन केले. यंदाच्या ५ ऑगस्ट रोजी मोदी सरकार काय करणार? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानामुळे उत्सुकता वाढली आहे. अमित शहांच्या उपस्थितीत योगी आदित्यनाथ ज्याप्रकारे भाजपा ५ ऑगस्टचं महत्त्व सांगत होते. त्यामुळे यंदा नेमकं काय होणार? अशी चर्चा सुरु झाली.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट हा पवित्र दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ५ ऑगस्टला सर्जिकल स्ट्राईक झालं होतं. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवलं होतं. याच दिवशी प्रभू राम मंदिराच्या भव्यदिव्य बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ५ ऑगस्ट खूप महत्त्वाची मानली जाते. भाजपा जन्मापासून आजपर्यंत, अटलबिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदीपर्यंत सर्वांचे ३ मोठी स्वप्न आहेत. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणं, अयोध्येत राम मंदिर बांधणे आणि तिसरं समान नागरिक कायदा. या ३ पैकी २ पूर्ण झाली आहेत. त्यासाठी ५ ऑगस्ट दिवस निवडण्यात आला आहे.