"मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धमाका; भाजपचे ६-७ खासदार पक्ष सोडणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 07:34 PM2021-01-12T19:34:00+5:302021-01-12T19:34:48+5:30
भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार माघारी परतणार असल्याचा तृणमूलच्या मंत्र्याचा दावा
कोलकाता: विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्यानं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेससमोर भारतीय जनता पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या काही आठवड्यांपासून तृणमूल काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता तृणमूलनं भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.
गेल्याच महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीपश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान तृणमूलच्या अनेक आमदारांनी कमळ हाती घेतलं. भाजपच्या या राजकारणाला तृणमूलनं त्याच पद्धतीनं उत्तर देण्याची तयारी केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजपचे ६-७ खासदार तृणमूलमध्ये येतील, असा दावा तृणमूलचे नेते आणि पश्चिम बंगालचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी केला.
Six-seven MPs will immediately join TMC within the first week of May, before the elections. Even all the MLAs who'd left us, have queued up for rejoining. Tushar babu, the MLA from Bankura rejoined yesterday: West Bengal minister Jyotipriya Mallick pic.twitter.com/tt2BiaKxCt
— ANI (@ANI) January 12, 2021
स्वामी विवेकानंद यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त उत्तर २४ परगणा जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभादरम्यान मलिक यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या शुभेंदु अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल विचारलं असता, ते तिथे का गेले ते मलादेखील माहीत नाही. ते भाजपमध्ये ४-५ महिने राहतील का, असा प्रश्न मला पडला आहे. कदाचित त्यांचं काम झाल्यावर ते पक्ष सोडतील, असं मलिक म्हणाले.
पुढील काही महिन्यांत भाजपमध्ये एकही व्यक्ती दिसणार नाही. लवकरच ६-७ खासदार तृणमूलमध्ये येतील. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश होईल. यामध्ये तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्यांचादेखील समावेश आहे. तृणमूलमध्ये घरवापसी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. ही मंडळी लवकरच स्वगृही परततील, असा दावा मलिक यांनी केला.