देशातील ९५ मतदारसंघांत ७० टक्क्यांनी बजावला हक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 06:27 AM2019-04-19T06:27:46+5:302019-04-19T06:28:55+5:30
पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील हिंसाचाराच्या काही घटना वगळता १२ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील ९५ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी शांततेत मतदान झाले.
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील हिंसाचाराच्या काही घटना वगळता १२ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील ९५ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी शांततेत मतदान झाले. वरील दोन राज्यांत हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार, अश्रुधूर व हवेत गोळीबार करावा लागला. या मतदारसंघांत सरासरी ६९.४0 टक्के मतदान झाले.
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये १५ टक्के तर उधमपूरमध्ये ६२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. श्रीनगरमधील ईदगाह, खनयार, हब्बा कदल व बाटमालू या परिसरातील ९० केंद्रांवर एकाही मतदाराने मतदान केले नाही. तामिळनाडूमध्ये ७२ टक्के, आसाममध्ये ७३ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७५ टक्के, मणिपूरमध्ये ७४ टक्के तर छत्तीसगडमध्ये ७१ टक्के मतदान झाले. पण कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मतदानाचे प्रमाण ६१ ते ६५ टक्क्यांच्या आसपासच होते.
ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी काही ठिकाणी आल्याने यंत्रे बदलून देण्यात आली. दार्जिलिंगमध्ये काहींनी ईव्हीएमची नासधूस केली. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी बुथ बळकावल्याचा आरोप द्रमुकने केला. मात्र त्यात तथ्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बंगालमधील एका बुथमध्ये मतदानास मज्जाव केल्याची तक्रार करीत लोकांनी रास्ता रोको केला. माकपचे उमेदवार मोहम्मद सलिम यांच्या वाहनावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची तक्रार आहे. ते वाहन नंतर जाळण्यात आले. त्यामुळे मोहम्मद सलिम यांना एका मतदान केंद्रात आसरा घ्यावा लागला.