तेव्हा रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यास भाजपनेच दिला होता पाठिंबा, शिवसेनेचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 08:33 PM2021-07-16T20:33:21+5:302021-07-16T20:34:13+5:30

Shiv Sena-BJP Politics: २०१३ मध्ये सत्तेत असताना भाजपने गोवंडीतील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास पाठिंबा दिला होता, असा दावा करीत शिवसेनेने भाजपलाच अडचणीत आणले आहे.

8 year ago, BJP had given its support to naming the road after Tipu Sultan, Shiv Sena's strong retaliation | तेव्हा रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यास भाजपनेच दिला होता पाठिंबा, शिवसेनेचा जोरदार पलटवार

तेव्हा रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यास भाजपनेच दिला होता पाठिंबा, शिवसेनेचा जोरदार पलटवार

googlenewsNext

मुंबई - गोवंडी येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास भाजपने विरोध दर्शवित महापौरांकडे दाद मागितली आहे. प्रत्यक्षात २०१३ मध्ये सत्तेत असताना भाजपने गोवंडीतील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास पाठिंबा दिला होता, असा दावा करीत शिवसेनेने भाजपलाच अडचणीत आणले आहे. राजकारण करण्यासाठीच नामकरणावरून आगपाखड सुरू असल्याचा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. (8 year ago, BJP had given its support to naming the road after Tipu Sultan, Shiv Sena's strong retaliation)

गोवंडी, कचराभूमी येथील एका उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत बाजार उद्यान समितीच्या सभेचा भाजप सदस्यांनी त्याग केला होता. मात्र संबंधित उद्यानाचे काम अपूर्ण असल्यामुळे माहिती मागवून प्रस्ताव आयुक्तांकडे परत पाठवत असल्याची भूमिका बाजार उद्यान समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी घेतली होती. यामुळे संतप्त भाजप सदस्यांनी अध्यक्षांना घेराव घालून घोषणाबाजी केली. तसेच महापौर दलनातही आंदोलन केले. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आक्रमक पावित्र्याने शिवसेना मात्र अडचणीत आली आहे.

मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवरच डाव उलटविला. गोवंडी, बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून रफीक नाल्यापर्यंतच्या मार्गाला तत्कालीन अपक्ष नगरसेवक मोहम्मद सिराज शेख यांनी ‘टिपू सुलतान’ नाव देण्याची मागणी केली होती. या मागणीला विद्यमान भाजप आमदार, तत्कालीन नगरसेवक अमित साटम यांनी अनुमोदन दिले होते. त्यामुळे भाजप नगरसेवकांकडून शिवसेनेला नाहक बदनाम करण्यासाठीच आरोप केले जात असल्याचे महापौरांनी सांगितले. २०१३ मध्ये स्थापत्य समितीत मंजुरीसाठी मांडलेल्या, भाजपचा पाठिंबा असलेल्या प्रस्तावाची प्रतच त्यांनी दाखविली. 

असा सुरू झाला वाद....
गोवंडी, प्रभाग क्रमांक १३६ मधील नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी येथील पालिकेच्या उद्यानास ‘टिपू सुलतान उद्यान' असे नाव देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. नामकरणाचा हा प्रस्ताव बाजार उद्यान समितीच्या बैठकीत प्रशासनाने मांडला. मात्र संबंधित उद्यानाचे काम अपूर्ण असल्यामुळे प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठवण्यात आला आहे. शिवसेना हिंदूविरोधी असल्याचा आरोप भाजप करीत आहे.
शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडलेले नाही. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक रंग भाजप देत आहे. भाजपच्याच पाठिंब्याने मुंबईत या आधीही काही ठिकाणी ‘टिपू सुलतान’ नाव देण्यात आले आहे.
- किशोरी पेडणेकर( महापौर, मुंबई)

Web Title: 8 year ago, BJP had given its support to naming the road after Tipu Sultan, Shiv Sena's strong retaliation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.