"ठाकरे सरकार अन् बीएमसीचा ९०० कोटींचा जमीन घोटाळा"; चौकशी करण्याची मागणी

By प्रविण मरगळे | Published: October 29, 2020 08:44 AM2020-10-29T08:44:14+5:302020-10-29T08:46:09+5:30

BJP Allegation on CM Uddhav Thackeray News: २ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिकेच्या सुधार समितीने या भूखंडाच्या ताब्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र परदेशी यांनी तो फेटाळला.

900 crore land scam of Thackeray government and BMC; Demand for an inquiry by BJP Kirit Somayya | "ठाकरे सरकार अन् बीएमसीचा ९०० कोटींचा जमीन घोटाळा"; चौकशी करण्याची मागणी

"ठाकरे सरकार अन् बीएमसीचा ९०० कोटींचा जमीन घोटाळा"; चौकशी करण्याची मागणी

Next
ठळक मुद्दे२९ नोव्हेंबर रोजी सुधार समितीची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक होणार होती.या बैठकीत दहिसर एकसर येथील भूखंडाच्या खरेदीचा विषय नव्हता. मात्र हा विषय तातडीचा विषय म्हणून हा भूखंड खरेदी विषय बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेत घेण्यात आला.राज्य सरकार आणि  मुंबई महापालिका २८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अतिक्रमण असलेला हा भूखंड एवढ्या चढ्या किमतीत घेण्यास विरोध करीत होते

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एका भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे. २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे सरकारने सत्तेत आल्या आल्या दहिसर येथील एका बिल्डरला ९०० कोटींची जमीन बहाल करण्याचा निर्णय घेतला असा आरोप भाजपानं केला आहे.

याबाबत किरीट सोमय्या म्हणाले की, गेल्या १० वर्षांत दहिसर येथील ७ एकर जमिनीच्या खरेदीचा प्रस्ताव मांडला गेला होता, मात्र तो स्वीकारला गेला नव्हता. निशल्प रिऍलिटीने हा भूखंड खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. या जागेवर १०० टक्के अतिक्रमणे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या जमिनीच्या खरेदीचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. ही जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव म्हणजे बृहन्मुंबई महापालिकेची कोट्यवधींची उधळपट्टी करण्यासारखे आहे असे स्पष्ट मत नोंदविले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे त्यावेळचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महापालिकेच्या सुधार समितीला पत्र पाठवून या जमिनीचा ताबा घेण्यास स्पष्ट विरोध दर्शविला होता असं ते म्हणाले.

तर २ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिकेच्या सुधार समितीने या भूखंडाच्या ताब्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र परदेशी यांनी तो फेटाळला. निशल्प रिऍलिटीने मांडलेला हा प्रस्ताव कसा अव्यवहार्य आहे आणि त्यामुळे तो फेटाळणे कसे आवश्यक आहे, याबाबतची सविस्तर टिप्पणी दिली होती. २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा प्रस्ताव मांडला. २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २९ नोव्हेंबर रोजी सुधार समितीची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक होणार होती. या बैठकीत दहिसर एकसर येथील भूखंडाच्या खरेदीचा विषय नव्हता. मात्र हा विषय तातडीचा विषय म्हणून हा भूखंड खरेदी विषय बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेत घेण्यात आला. प्रवीण परदेशी यांनी महापालिका आयुक्त असताना या भूखंडाची किंमत ५४ कोटीच्या आसपास आहे, असे स्पष्ट मत नोंदविले होते.

१५ ऑक्टोबर २०१९ रोजी तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काढलेल्या सूचनापत्रकात, अशा कोणत्याही जागेचा ताबा कोणत्याही अडचणीविना मिळाला पाहिजे, असे मत दिले होते. या भूखंडाचे मूल्य निर्धारण ३५४ कोटी करण्यात आले त्यावेळीही परदेशी यांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला होता. असे असताना ठाकरे सरकारने महापालिकेच्या वित्त विभागाला या भूखंडाच्या खरेदीपोटी ३४९ कोटी, १४ लाख १९ हजार १३ रु. इतकी रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली. बिल्डरकडून ५४ कोटी रु. चा भरणा अनामत रक्कम म्हणून अगोदरच करण्यात आला होता. त्यामुळे १५ फेब्रुवारी २०२० रोजी उर्वरीत २९४ कोटी रु. चा मोबदला निशल्प रिऍलिटीला देण्यात आला. आता संबंधित बिल्डर या जागेचे ३४९ कोटी रु. हे मूल्यनिर्धारण चुकीचे आहे, असा दावा करीत आहे. या बिल्डरने नागपूर येथील महसूल न्यायाधिकरणाकडे अपील करून या भूखंडाची किंमत ९०० कोटी रु असल्याचा दावा केला आहे. या बिल्डरने मुंबई महापालिकेकडे उर्वरीत ५५० कोटी रु. देण्याची मागणी केली आहे.

या भूखंडाची मी प्रत्यक्ष पाहणी केली असून या भूखंडावरील अतिक्रमणे हटविणे शक्य नाही. राज्य सरकार आणि  मुंबई महापालिका २८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अतिक्रमण असलेला हा भूखंड एवढ्या चढ्या किमतीत घेण्यास विरोध करीत होते. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर एका रात्रीत राज्य सरकारची आणि महापालिकेची भूमिका बदलली आणि ९०० कोटींच्या भूखंडाची भेट एका बिल्डरला देण्यात आली. या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Web Title: 900 crore land scam of Thackeray government and BMC; Demand for an inquiry by BJP Kirit Somayya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.