"भाजपा फक्त दोन गुजरात्यांचा पक्ष झालाय, एक रंगा, तर दुसरा बिल्ला"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 05:28 PM2019-04-05T17:28:38+5:302019-04-05T17:29:29+5:30
आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला
नवी दिल्लीः आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी न दिल्यानं नाराजी व्यक्त केली आहे, ते म्हणाले, भाजपा आता फक्त दोन गुजरात्यांचा पक्ष झालाय, एक रंगा आणि दुसरा बिल्ला यांचा पक्ष बनून राहिलाय. भाजपानं लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांचं तिकीट कापलं आहे. त्यानंतर आता मोदी आणि शहांविरोधात इतर राजकीय पक्षांचे नेते तीव्र नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
संजय सिंह ट्विट करत म्हणाले, अडवाणीजी, जोशीजी, सुमित्रा ताई, कलराज मिश्रा यांचं तिकीट कापलं आहे. सुषमा स्वराज आणि उमा भारतींनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भाजपा फक्त दोन गुजरात्यांचा पक्ष बनून राहिलाय. तो पक्ष एक रंगा आणि दुसरा बिल्ला चालवतोय. गेल्या काही दिवसांपूर्वीही संजय सिंह यांनी मोदींवर टीका केली होती. मोदींनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर सडकून टीका केली होती.
आडवाणी जी, जोशी जी, सुमित्रा ताई, कलराज मिश्रा का टिकट काट दिया, सुषमा स्वराज, उमा भारती ने चुनाव लड़ने से ख़ुद मना कर दिया यही हाल रहा तो भाजपा सिर्फ़ दो गुजरातियों की पार्टी बनकर रह जायेगी एक "रंगा और दूसरा बिल्ला"
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) April 5, 2019
' सपाचा 'स' रालोदचा 'रा' आणि बसपाचा 'ब' ही सराब (दारू) सत्यानाश करेल,' अशी टीका मोदींनी केली होती. नेमक्या या विधानावरच संजय सिंह यांनी बोट ठेवलं आहे. ' मोदींची तपासणी करा. ते गांजा तर ओढत नाहीत ना? राजकीय पक्षांना गांजा, दारू, कोकेन अशा उपमा एखादा छोटासा गटनेता, चौकातील नेता देऊ शकतो. पंतप्रधानांना ही भाषा शोभत नाही', असं ते म्हणाले होते.