‘आप’-काँग्रेस आघाडीसाठी प्रयत्न करीनच - अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:45 AM2019-04-15T04:45:13+5:302019-04-15T04:45:34+5:30
दिल्लीत आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीबद्दलची शक्यता सध्या संपलेली नाही याचे संकेत स्वत: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिले.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीबद्दलची शक्यता सध्या संपलेली नाही याचे संकेत स्वत: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिले.
‘लोकमत’ ने विचारलेल्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी मी शेवटपर्यंत आघाडीसाठी प्रयत्न करीन.’ हरियाणात ‘आप’ ने जजपासोबत (जननायक जनता पार्टी) नुकतीच आघाडीची घोषणा केली होती. त्यानंतर असे मानले जात होते की, दिल्लीत ‘आप-काँग्रेस’ यांच्यातील आघाडीची शक्यता संपली आहे. मात्र केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर सध्या तरी ‘आप-काँग्रेस’ आघाडीची शक्यता शिल्लक आहे.
दिल्लीत ‘आप-काँग्रेस’ यांच्यातील आघाडीवरून काही दिवसांपूर्वी ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनीकाँग्रेसशी कोणतीही आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेस एक अव्यावहारिक करार करू इच्छितो जो शक्य नव्हता, असे ते म्हणाले. पंजाबमध्ये ‘आप’ चे चार खासदार आणि २० आमदार आहेत तेथे काँग्रेस एकही जागा द्यायला तयार नाही. ज्या हरियाणात काँग्रेसचा फक्त एकच खासदार आहे तरीही काँग्रेस जागा द्यायला तयार नाही. गोव्यात ‘आप’ने ६ टक्क्यांपेक्षाही जास्त मते घेतली होती तेथेही काँग्रेस जागा द्यायला राजी नाही.
>काँग्रेसला हव्या तीन जागा
काँग्रेसला ‘आप’कडून तीन जागा हव्या आहेत. हे पूर्णपणे अव्यावहारिक आहे. यानंतर हरियाणात जजपासोबत ‘आप’ ने तीन जागांवर आघाडी केली त्यामुळे दिल्लीत काँग्रेससोबत आघाडीची शक्यता संपली असेच मानले जात होते. परंतु, रविवारी केजरीवाल यांनी शेवटपर्यंत आघाडीसाठी प्रयत्न करण्याचे वक्तव्य केल्यामुळे दिल्लीत आघाडीच्या शक्यतेला हवा मिळाली.