Aasam Assembly Elections: "रिकामी तिजोरी भरण्यासाठी काँग्रेसला कोणत्याही पद्धतीने हवी आहे सत्ता"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 06:58 AM2021-03-22T06:58:26+5:302021-03-22T06:58:52+5:30
पंतप्रधान मोदी यांची टीका : राज्यातील विकासाचा वाचला पाढा
बोकाघाट (आसाम) : देशात आणि राज्यात विविध भागांत प्रभाव कमी होत असलेल्या काँग्रेसची तिजोरी आता रिकामी झाली आहे. त्यामुळे ती भरण्यासाठी ते कोणत्याही प्रकारे सत्तेत येऊ इच्छितात. यासाठी ते कोणाशीही तडजोड करू शकतात, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे विरोधकांवर हल्लाबोल केला.
रालोआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, जेव्हा केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेसची सरकारे होती तेव्हा आसामकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी राज्यातील लोकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले नाही. आज केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने आसाम विकासाच्या मार्गावर आहे. महामार्गांचे काम दुप्पट वेगाने सुरू आहे. कारण, राज्य सरकारही आसामला देशाशी जोडत आहे. आता प्रत्येकाला छत आणि प्रत्येक घरात पाणी असे कामे वेगाने होत आहेत. ते म्हणाले की, या लोकांना खोटे आश्वासने देण्याची, खोटे जाहीरनामे बनविण्याची सवय झाली आहे. काँग्रेस म्हणजे खोट्या जाहीरनाम्याची हमी. काँग्रेस म्हणजे भ्रम, अस्थिरता, बॉम्ब, बंदूक आणि नाकेबंदी यांची हमी. स्वत:ला धर्मनिरपेक्ष सांगणारा हा पक्ष आसाम, प. बंगाल आणि केरळमध्ये धार्मिक आधारावर बनलेल्या पक्षांसोबत मैत्री करत आहे. झारखंड, बिहार, महाराष्ट्रात ज्यांच्यासोबत यांची आघाडी आहे ते प. बंगालमध्ये यांच्याविरुद्ध प्रचार करत आहेत.
त्यांची मैत्री केवळ खुर्चीशी आहे
मोदी म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वात रालोआ सरकार सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास या धोरणानुसार पुढे जात आहे. मात्र, आजच्या काँग्रेस नेत्यांना केवळ सत्ता हवी आहे. मग ती कोणत्याही प्रकारे मिळाली तरी चालेल. खरे तर काँग्रेसची तिजोरी रिकामी झाली आहे. ती भरण्यासाठी त्यांना कशीही सत्ता हवी आहे. काँग्रेसची मैत्री केवळ खुर्चीशी आहे. त्यांच्याकडे ना नेतृत्व आहे ना दृष्टी. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या पाच आश्वासनांचा उल्लेख करुन ते म्हणाले की, ५० वर्षांपर्यंत आसाममध्ये राज्य करणारे लोक आजकाल राज्याच्या जनतेला पाच आश्वासनांची हमी देत आहेत.