बिहारमध्ये NDAचाच बोलबाला, 40 पैकी 34 जागांवर मिळवणार कब्जा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 08:15 PM2019-04-02T20:15:10+5:302019-04-02T20:20:10+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे.
नवी दिल्लीः गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. राहुल गांधी आणि मोदी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. त्याचदरम्यान अनेक संस्थांनी सर्व्हे करण्यासही सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा आणि नील्सननं निवडणूकपूर्व सर्व्हे केला असून, उत्तर बिहारमधल्या 12 पैकी 11 जागांवर एनडीए विजयी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. या 40 मतदारसंघांतल्या 10 हजार 212 लोकांची मतं जाणून घेतली आहे.
उत्तर बिहारमधल्या 12 पैकी 11 जागांवर एनडीएचा विजय होणार आहे, असं सर्व्हेत म्हटलं आहे. वाल्मिकीनगर, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, शिवहर, मुजफ्फरपूर, वैशाली, हाजीपूर, सारण, सीवान, महाराजगंज, गोपालगंज या मतदारसंघांमध्ये भाजपा विजयी होण्याची शक्यता असून, सीतामढीची जागा यूपीएकडे जाण्याची शक्यता आहे. तर बिहारच्या मिथिलांचल क्षेत्रातील नऊच्या नऊ जागांवर एनडीएचा विजय होण्याचा अंदाज आहे. सुपौल, मधेपुरा, खगडिया, बेगुसराय, झंझारपूर, मधुबनी, दरभंगा, समस्तीपूर आणि उजियारपूरमधून एनडीएला विजय मिळणार असल्याचा अंदाज आहे.
बिहारमध्ये 40 जागांपैकी 35हून जास्त जागा एनडीए जिंकण्याचा आडाखे बांधले जात आहेत. तर बिहारच्या सीमांचल पूर्व बिहारमध्ये 7 जागांपैकी चार जागा एनडीए जिंकणार असल्याचा दावा केला जातोय. तर यूपीएसुद्धा 3 जागांवर विजय मिळवू शकते. सर्व्हेनुसार, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, जमुई या जागांवर एनडीएचा विजय होणार असून, अररिया, भागलपूर आणि बांका जागेवर यूपीएचं खातं उघडणार आहे. एबीपी-नील्सनने हा सर्व्हे 17 ते 26 मार्चदरम्यान केला आहे.