आदित्य ठाकरेंनी ठाण्यातून लढावे; ही तर युवा सैनिकांची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 05:32 AM2019-03-13T05:32:41+5:302019-03-13T06:53:18+5:30
युवासेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणूक लढवायचीच असेल, तर त्यांनी ती ठाणे लोकसभा मतदारसंघातून लढवावी, अशी मागणी युवा सैनिकांनी पक्षनेतृत्वाकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे : युवासेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणूक लढवायचीच असेल, तर त्यांनी ती ठाणे लोकसभा मतदारसंघातून लढवावी, अशी मागणी युवा सैनिकांनी पक्षनेतृत्वाकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेसाठी सुरक्षित मतदारसंघ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पहिली सत्ता ठाण्याने मिळवून दिल्याने, ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल, तर तिने ठाण्याचा विचार करावा, असे युवा सैनिकांचे म्हणणे आहे.
आदित्य हे लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध होताच, ठाण्यातील युवा सैनिकांमध्ये चर्चेचा व औत्सुक्याचा विषय ठरला. सोशल मीडियावर युवा सैनिकांनी हे वृत्त शेअर केले. त्यातूनच आदित्य यांनी ठाण्यातून निवडणूक लढवावी, अशी मागणी पुढे आली. उत्तर-मध्य मतदारसंघातून आदित्य निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी वृत्तात दिली आहे, परंतु त्यापेक्षा ठाणे लोकसभा मतदारसंघ अधिक सुरक्षित आहे व ठाणेकरांचे सेनेवर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम असल्याने आदित्य यांनी येथून विजयश्री मिळवावी, असे युवा सैनिकांना वाटते.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सेनेचे राजन विचारे यांना ५ लाख ९५ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यानंतर, आता पुन्हा युती झाल्याने ठाण्यातून आदित्य रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होतील, असे सैनिकांचे म्हणणे आहे. विचारे यांच्या उमेदवारीला भाजपामधील नगरसेवकांचा विरोध असून, त्यांच्याऐवजी अन्य कोणताही उमेदवार शिवसेनेने दिला, तर आम्ही त्याच्यासाठी काम करू, अशी भूमिका भाजपाच्या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे आदित्य यांना पक्षाने उमेदवारी दिली, तर सर्व वाद तर संपुष्टात येतीलच, शिवाय युती या नात्याने भाजपाचे नेते मनापासून आदित्य यांच्या विजयाकरिता प्रयत्न करतील, असा विश्वास शिवसैनिकांना वाटतो.
गांभीर्याने विचार करण्याची मागणी
कोपरी पाचपाखाडी तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जात आहे, तसेच या ठिकाणी सेनेचे २८ नगरसेवक आहेत. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात भाजपाचे १७ आणि सेनेचे १२ नगरसेवक आहेत. ओवळा माजिवडा मतदारसंघातील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या विचारात घेता तब्बल ३५ नगरसेवकांचे पाठबळ आहे. याशिवाय भाजपाचेसुद्धा मीरा-भार्इंदरमध्ये ६१ नगरसेवकांचे पाठबळ ही आदित्य यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. त्यामुळेच त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाचा गांभीर्याने विचार करावा, अशी आग्रही मागणी केली जात आहे.